भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर

पुण्यापासून अहमदनगर रोडवर ५०-६० किलोमीटरवर रांजणगाव गणपती हे अष्टविनायक गणेशापैकी एक मंदिर आहे. रस्त्याच्या दक्षिण बाजूला हे मंदिर असून रस्त्याच्या उत्तरेकडे खूप मोठी औद्योगिक वसाहत आहे. नॅशनल, मल्टिनॅशनल अशा २०० ते २५० लहान-मोठ्या कंपन्या एमआयडीसीमध्ये आहेत. संध्याकाळी सहाची शिफ्ट सुटल्यानंतर शेकडो कामगारांना घेऊन बसेस पुणे शहराकडे जायला रोडवर तुटून पडतात. रोड छोटे तर, त्यावर संध्याकाळी ६ ते ८ या कालावधीत वाहने तुफान. त्यामुळे ट्रॅफिक जॅमिंग ठरलेलं.

गड्डी चला रहा है या टांगा?
अशाच वेळेत एके दिवशी एक ग्रे कलरची इनोव्हा ट्रॅफिक तोडत पुण्याकड्न नगर रोडने घाईघाईत चालली होती. रांजणगाव मंदिर पास करून ही कार पुढील चौकात आली. कारच्या पुढे वाळूचा ट्रक होता. तो डुलत, डुलत आपल्याच तालात चालला होता. त्यामुळे इनोव्हा चालकाचे मस्तक फिरले होते. ते मस्तक साधंसुधं नव्हत तर, पगडी घातलेलं होतं. म्हणजे सरदार होता तो… “पानचोत, गड्डी चला रहा है या टांगा?” असं म्हणत सरदार हॉर्न देत होता. आणि अचानक वाळूच्या ट्रक चालकानं ब्रेक मारला… तशी सरदारजीची गाडी एकदम ट्रकला धडकली… सरदारजीच्या मागच्या गाडीनेही सरदारजीच्या गाडीला ठोकर दिली. झाले, भडकणार नाही तो सरदार कसला? त्याने गाडीतून उतरून वाळूच्या ट्रक ड्रायव्हरला खाली ओढून बुकलायला सुरुवात केली. तसा ड्रायव्हर ठोs ..ठोs..करुन बोंबलायला लागला. ते बघायला हीs गर्दी जमली…

रस्त्यावरच्या मेडिकल दुकानाबाहेर तीन टगे थांबले होते. ते पळत आले आणि सरदारजीला थांबवायला लागले. तरी सरदारजी माघार घ्यायला तयार होईना. तेव्हा त्या तिघांनी सरदारजीवरच हात टाकला. हे भांडण आवरायला सरदारजीच्या इनोव्हा गाडीत पाठीमागे बसलेला तेज:पुंज चेहऱ्याचा जीन्स, टी शर्ट घातलेला तरुण बाहेर आला. त्याच्याही अंगावर हे टगे धावले आणि धक्काबुक्की करू लागले. तिथं आणखी जमाव जमला. ते पाहून सरदारजी थबकला. “महाराजजी चलीये, भागीये ये कोई प्लॅन दिख रहा है…” असं म्हणून त्याने त्या टी शर्टमधील व्यक्तीला घेऊन कार सुसाट वेगात पुढे दामटली. कार इंदोरकडे भरगांव वेगात निघाली.

My goal is women's safety, not reservation, says spiritual guru Bhaiyyu Maharaj - India Today

ती तेज:पुंज व्यक्ती म्हणजे…
कारमधे टी शर्टमधील तेज:पुंज चेहऱ्याची व्यक्ती दुसरी तिसरी नसून साक्षात राष्ट्रसंत भैय्युजी महाराज होते. जिन्स, टी शर्टमध्ये त्यांना कोणी ओळखणे आणि तेसुध्दा अशा परिस्थितीमध्ये अशक्य कोटीतील गोष्ट होती. त्यांची गाडी सुसाटपणे इंदोरकडे पळू लागली. घटना घडल्यानंतर नगरच्या पुढे गेल्यावर त्यांनी मोबाईलवरून आपल्यावर हल्ला झाल्याची घटना प्रेसला, नेतेमंडळींना कळवली आणि लगेच टीव्ही चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी मी असल्याने वरिष्ठ अधिकारी, पत्रकार यांचे मला फोन सुरू झाले. घटनास्थळ १० मिनिटांच्या अंतरावर असल्याने आम्ही तेथे लगेच पोहचलो. पांगापांग होऊन वाहतूक सुरू झाली होती. स्पॉटवरही फारसे काही मिळाले नाही, मात्र आजूबाजूला cctv कॅमेरे होते. आम्ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या साक्षीदारांची नावे घेतली. खुनी हल्ला, कटकारस्थान, मारहाण, शिवीगाळ, वगैरेचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.

ती रात्र अक्षरशः जागून काढावी लागली. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच इंदूरवरून महाराजांच्या मठामधील सुरक्षा अधिकारी रांजणगाव पोलिस स्टेशनला आले. त्यांनी अत्यंत बारकाईने झालेल्या हल्ल्याबाबत माहिती घ्यायला सुरुवात केली. सर्वसाधारण पोलिसांवर प्रथमदर्शनी तरी कोणाचा विश्वास नसतो. त्यात बाहेरच्या राज्यामधील लोकांचा तर नसतोच नसतो. हे लक्षात ठेऊन मी कसलीही शंका येणार नाही, याची खबरदारी बाळगत त्यांना सर्व कारवाईची माहिती देत होतो. मध्यप्रदेशामधील असले तरी, त्यापैकी काहींना चांगलं मराठी येत होतं. कारण ते नागपूर, अमरावतीचे होते. महाराजांवर पाळत ठेऊन हा हल्ला झाला आहे. हे खूप मोठे कारस्थान आहे. पुण्यावरून पाठलाग झाला आहे. रांजणगावात महाराजांवर हल्ला करून त्यांना ठार मारायचा कट होता. नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. साहेब ही केस लाईटली घेऊ नका. यातील पाळेमुळे हुडकून काढा, कठोर कारवाई करावी लागेल. हलगर्जीपणा झाला तर, खूप मोठी कारवाई होईल. तुमचे वरिष्ठ अधिकारी, एसपी, डीवायएसपीसुध्दा सुटणार नाहीत यातून वगैरे वगैरे बोलून त्यांनी वातावरण एकदम गंभीर करुन टाकलं.

देवा, तूच मार्ग दाखव…
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर मी एसपी, डीवायसपींना फोन करून सर्व गोष्टींची कल्पना दिली. त्यांना या गोष्टींची आधीच कल्पना होती. काहीही मदत लागली तर सांग, आम्ही स्टाफ, गाड्या वगैरे पाठवतो पण, सखोल तपास झाला पाहिजे, असे त्यांनी बजावले. पोलिस महासंचालक या केसवर लक्ष ठेऊन आहेत. पंतप्रधान कार्यालयातूनही सतत माहिती घेतली जात आहे. बघ, प्रकरण तुझ्यावर शेकायला नको.. असाही गर्भीत इशारा द्यायला ते विसरले नाहीत. आता माझं काही खरं नाही. या प्रकरणात कमी पडलो तर आपलं सस्पेन्शन किंवा बदली ठरलेली आहे. मनातून रांजणगाव गणपतीला साकडं घातलं, देवा तूच मार्ग दाखव…

या प्रकरणाचा छडा लावायचाच असा ठाम निर्धार करून मी कामाला लागलो. भैय्युजी महाराज तर इंदूरहून परत पोलिस स्टेशनला येऊ शकणार नव्हते. त्यांच्या माणसांना मी सांगितले की, भैय्युजी महाराजांसोबत मला बोलायचे आहे. केसच्या तपासाकरिता महत्त्वाची माहिती घ्यायची आहे. इंदूरवरून आलेल्या त्या माणसाने त्वरीत महाराजांच्या पीएला फोन लावला आणि सांगितले की, ठाणेदार साहेबांना केसच्या संदर्भाने महाराजांना काही माहिती विचारायची आहे. त्यावेळी त्यांच्या पीएने कळवले की, महाराज ध्यानाला बसले आहेत. दोन तासांनी कळवतो. “साहेब, महाराज आपल्याशी बोलणार आहेत… ” त्या इंदूरच्या माणसाने मला सांगितले. मी लगेच त्यांचा मोबाईल घेतला, ” हॅलो… ” पलिकडून मृदु पण, धीरगंभीर आवाज आला. “महाराज नमस्कार, मी रांजणगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर बोलतो आहे… ” “नमस्कार, इंदलकरजी मी भैय्यु महाराज इंदूरवरून बोलतो आहे. तुम्ही मला ओळखता का?” शुध्द मराठीत गुरुजी बोलत होते.

“हो महाराज, आपल्याला कोण ओळखत नाही..? आपल्याला आठवते का, आपण चार-पाच वर्षांपूर्वी साधारण २००५ साली शिवराज्याभिषेक स्मृतिदिनी प्रमुख पाहुणे म्हणून रायगडला आला होतात… तेथे तुम्ही तलवारीची अतिशय लीलया कसरत करून दाखवली होती…” “हो, हो.. एवढं कसं आपणाला माहिती?” महाराजांनी विचारले. तेव्हा मी लगेच सांगितलं की, “त्यावेळी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांबरोबर सुरुवातीला आम्ही मोजकेच लोक शिवराज्याभिषेक सोहळ्याला आलो होतो. तुम्ही प्रमुख पाहुणे होतात आणि तुमच्या निवासाची सारी व्यवस्था संभाजी महाराजांनी माझ्यावर सोपवली होती. आमचे पूर्वज हिरोजी इंदलकर यांनीच त्या काळी छत्रपतींच्या आज्ञेने रायगड किल्ला बांधला, हा इतिहास आहे… यावर भैय्युजी महाराज म्हणाले, “हो, बरोबर आहे. मी जाणून आहे ते…”

आता मी निश्चिंत झालो…
“आपली निवासाची व्यवस्था मी महाडला माझा उद्योजक मित्र सूर्यकांत महाडिक याच्या प्रशस्त बंगल्यावर केली होती. दुसऱ्या दिवशी तेथून आम्ही आपल्याला ‘रोप वे’ने रायगडावर कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. भैय्युजी महाराजांना सर्व आठवले. त्यांना खूप आनंद झाला. ते बोलले की, “आता मी निवांत झालो. तुमच्याबद्दल मला तीळमात्र शंका राहणार नाही. पण, माझ्याविरुध्द खूप मोठी साजीश आहे. मी पंतप्रधानांशी बोललो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहनजी भागवत माझ्या घरी येऊन गेले. तुम्ही या केसमधे मुळापर्यंत जा. काही मदत लागली, दबाव आला तर मला सांगा. कारण माझा पाठलाग पुण्यापासून सुरू होता, असा माझा दाट संशय आहे. रांजणगावात त्यांचे काही लोक आधीच थांबून होते. माझ्या कारच्या पुढे त्यांच्या वाळूचा ट्रक होता. त्याने मुद्दाम ब्रेक दाबून अपघात घडवला आणि त्यांचे दोन-तीन लोक वेपन घेऊन तेथे दबा धरून बसले होते. ते पळत आले. त्यांच्यापैकी तोंडावर लालसर डाग असलेल्या तरुणाने माझ्यावरही हल्ला केला. त्यांनी वेपन काढण्याच्या आत आम्ही सावध झालो आणि ताबडतोब आमच्या कारमधे बसून इंदूरकडे आलो, म्हणून वाचलो. वगैरे वगैरे. मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. ऐकता ऐकता नोटपॅडवर सगळ्या नोंदी घेत होतो. अशा बारीक सारीक नोंदी घेण्याची माझी सवय आहे. कारण त्यातूनच पुढचा सारा तपास अवलंबून असतो.

माझा माझ्या स्टाफवर भरोसा…
त्यानंतर मी भैय्यु महाराजांचा मित्र आणि कारचालक सरदारजी यास रांजणगावला बोलावून घेतले. ज्या ठिकाणी घटना घडली तेथे स्पॉटवर अनेक वेळा जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का हे पाहिले. आणखी साक्षीदार, दुकानदार यांच्याकडे बारकाईने चौकशी केली. सुदैवाने माझा परिसरात सतत संपर्क होता. अनेक छोट्या मोठ्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील स्टाफ, अधिकारी आणि स्थानिक लोकांशी सुसंवाद असल्याने, अनेकांना निरपेक्ष मदत केल्याने मला मदत मिळत गेली. दिल्ली, मुंबईमधून तपासाबाबत सतत माहिती घेतली जात होती. स्थानिक पत्रकार, मराठी, हिंदी, इंग्रजी दैनिकांचे पत्रकार, वार्ताहर, न्यूज चॅनेलवाले सतत माहिती विचारून त्रास देत होते. तपासाकरिता पुणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे, तर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पथकाचे पोलिस मदतीसाठी पाठवून दिले होते. परंतु माझ्याकडील पोलिसांवर माझा विश्वास होता. तसेच बाहेरचे पोलिस घेतले तर, माझा स्टाफ नाऊमेद झाला असता. त्यामुळे माझ्या स्टाफला एकदम विश्वासात घेऊन स्पष्टपणे ही केस कशी चॅलेंजिंग आहे, बाहेरच्या स्टाफची मदत न घेता आपण अत्यंत तन्मयतेने काम केलं तर, केस ओपन करता येईल, अगदीच काम हाताबाहेर असेल तर जरूर मदत घेऊ… असं त्यांना समजावलं आणि ते सर्वांना पटलं.

वेळ थोडा होता. दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या, एक म्हणजे रांजणगावात ज्यांनी हल्ला केला त्यांना पकडायचे होते आणि दुसरं म्हणजे ज्या वाळूच्या ट्रकमुळे हे सगळं रामायण झालं, तो ट्रकवाला धरून आणायचा होता. आम्ही यासाठी दोन पथकं केली. पोलिस हवालदार चव्हाण आणि हवालदार तेलंग हे वाहतूक पोलिसाचे काम करायचे. त्यातील तेलंग हे अतिशय चपळ आणि बेरकी, आरोपी पकडण्यात चलाख होते. तेलंग यांना सोबत स्टाफ देऊन ट्रकची माहिती घेऊन त्यांना अहमदनगरकडे रवाना केले. माझ्याकडील स्टाफ घेऊन मी जवळच असलेल्या रांजणगावात हल्लेखोरांचा शोध घेऊ लागलो.

प्रतिष्ठित घराण्याचा संबंध…
दरम्यान, मला गुप्त माहिती मिळाली की, ज्या तीन टग्यांनी हल्ला केला ते माऊली पाचुंदकरांकडे काम करणारे आहेत. त्यांना माऊलीने अज्ञात स्थळी लपवून ठेवले आहे. पाचुंदकर फॅमिली ही रांजणगावातील अतिशय मातब्बर अशी फॅमिली होती. चार पाच भाऊ होते. पैकी एक बाळासाहेब पाचुंदकर यांनी पोलिस अधिकारी म्हणून मुंबईला चेंबूर परिसरात कर्तृत्त्व गाजवले आहे आणि निवृत्त होऊन रांजणगावात व्यवसाय करीत आहेत. अडीअडचणीच्या वेळी ते मला खूप चांगले मार्गदर्शन करायचे. त्यांचा एक भाऊ डॉक्टर असून त्याचे मोठे हॉस्पिटल, एक मोठा उद्योजक, तर माऊली दोन-तीनशे बसेसचा मालक. माऊलीला मी पोलिस स्टेशनला बोलावून घेतले..

अतिशय बलदंड असलेला माऊली त्याची अलिशान जग्वार कार घेऊन आला. नेहमीप्रमाणे कार दूरवर उभी करून बाऊन्सर गाडीतच ठेवून एकटाच पायी माझ्या केबीनमध्ये आला. नमस्कार करून समोरच्या खुर्चीवर बसला. “माऊलीशेठ काय घटना झाली आहे ते तुम्हाला माहिती आहेच. दिवसभर टीव्हीवर तेच चालू आहे. मुख्यमंत्री काय, पंतप्रधानांपर्यंत ही घटना माहीत झाली आहे. आपल्याकडे वेळ फार थोडा आहे. लवकर आरोपी अटक झाले नाही तर, तुमची आमची चटणी होईल हे काय मी सांगायला नको…” “साहेब, आम्ही काय केलंय? तुम्हाला माहितीच आहे, मला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. दरवर्षी वारी करणारा मी माणूस. कधी किरकोळ शिवीगाळीचीही माझ्याविरुद्ध तक्रार नाही. धंदा आणि रांजणगाव मंदिर याच्या पलिकडे काय असतं ते मला माहीत नाही.. ” घाम पुसत, अंदाज घेत तो बोलत होता. “माऊली, तुमची काहीच चूक नाही, परंतु मारहाण करणारे ते तिघेही तुमचे कामगार आहेत. ज्या ठिकाणी लपून राहिलेत ते ठिकाणही कोठे आहे त्याची खबर आहे मला. माऊली, अजूनही आपल्याकडे वेळ थोडा आहे. तपासामधे काहीच प्रगती झाली नाही. केस वर गेली तर मात्र घोटाळा होईल. आरोपी लपवून ठेवले म्हणून तुम्हाला अटक होईल… ”

साहेब, गैरसमज झाला…
मी माऊलीला स्पष्ट सूचना दिल्याबरोबर तो घाम पुसू लागला… आणि लगेच कबूल झाला. त्याने सर्व प्रकार सांगितलला. “साहेब, ते माझे कामगार आहेत, गुन्हेगार नाहीत. औषध आणण्याकरिता ते काल संध्याकाळी चौकात मेडिकल शॉपमध्ये गेले होते. त्यांनी पाहिले की, एका मराठी ट्रक चालकाला पंजाबी सरदारजी ट्रकमधून ओढून मारतोय. ते थांबविण्यासाठी हे तिघे गेले. सरदारजी चांगला डांबरट होता. यांच्यावरच तो चालून आला. तेव्हा मात्र हे तिघे चिडले आणि त्यांनी सरदारजीला ठोकायला सुरुवात केली. चौकात प्रचंड गर्दी जमली. ट्रॅफिक जाम झाले. तेवढ्यात सरदारजीच्या कारमधील उंच गोरा युवक सरदारला वाचवायला आला. पण त्यालाही मारहाण झाली. मग घाबरून त्यांनी कार घेऊन पळ काढला. दुर्देवाने तेच भैय्यु महाराज असावेत. जीन्स, टी शर्टमध्ये पोरांनी त्यांना ओळखले नाही. खूप गंभीर प्रसंग आला आहे साहेब. त्या सर्वांची अतिशय गरिबीची परिस्थिती आहे. आपण चौकशी करा. त्यांचा दोष आढळला तर, काय वाटेल ती कारवाई करा, पण सर अन्याय करू नका. वाईट एवढेच वाटते की, भैय्यु महाराजांसारख्या दैवी व्यक्तीला यात गैरसमजुतीने त्रास झाला. आम्हीही त्यांचे भक्त आहोत.” माऊली मोठा उद्योजक असला तरी धार्मिक आणि व सरळ स्वभावाचा होता. त्याचे बोलणे मला पटत होते.

मी त्याला म्हटले, “मी सखोल तपास करेन आणि कितीही दबाव आला तरी जे योग्य तेच करेन…” माऊलीने निरोप घेतला. माझे बरेचसे काम झाले होते. मला तासभर वाट पाहावी लागली. माऊली सोबत ते तिघे टगे खाली मान घालून माझ्या चेंबरमध्ये हजर झाले. मी त्यांची चांगली खरडपट्टी काढली आणि पोलिसांना बोलावून त्यांचा ‘पाहुणचार’ घ्यायला सांगितला… आमची एक टीम अहमदनगरकडे तपासाला गेली होती. त्यांनी वाळूच्या ट्रकचा कसून तपास केला. ट्रकच्या पाठीमागे साखळ्या लोंबकळत होत्या. लाल रंगाचा ट्रक होता. शेवटी ५९ असा काही तरी नंबर होता, असे स्टेटमेंट सरदारजीने दिले होते. पोलिसांना एका ठिकाणी पाठीमागे साखळ्या लोंबकळत असलेला ट्रक लांबून दिसला. ट्रकचा रंग आणि शेवटचा नंबर जुळून येत होता. बारकाईने चौकशी केली तेव्हा ट्रक तोच असल्याचे समजले.

अखेर तो ट्रक सापडला…
ट्रकचा चालक आणि मालक दोघांनाही पोलिस संध्याकाळी सहाच्या सुमारास घेऊन आले. त्यांच्याकडे बारकाईने चौकशी सुरू केली. त्यांचे जाबजबाब नोंदवले. त्या सर्वांचे फोटो काढून भैय्यु महाराजांना पाठवले. त्यांनीही ते ओळखले. वाळूचा ट्रक, रांजणगावची हल्ला करनारी टपोरी पोरं, ट्रक ड्रायव्हर यांची सर्वांची ओळख पटली. आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला… झाला प्रकार हा एका निव्वळ अपघाताचा प्रकार होता. त्यामध्ये कसलीही साजीश, षडयंत्र, घातपाताचा प्रकार नव्हता हे दिसून आले… हा सर्व तपास करताना भैय्यु महाराजांची इंदूरवरून आलेली माणसं सतत हजर ठेवण्याचं भान मी ठेवलं. कसलीही शंका नको. जे काही होईल ते त्यांच्या समोर होऊ दे, अशा सूचना मी स्टाफला दिल्या होत्या.

कारण, तपास चालू असताना प्रत्येक बारीकसारीक गोष्ट ते मोबाईलवरून इंदूरला कळवत होते. मीसुध्दा माझ्या सर्व वरिष्ठांना सतत तपासाची प्रगती कळवत होतो. तपास पूर्ण झाल्यानंतर डीवायसपी, एसपी यांनी पोलिस स्टेशनला येऊन सर्व आरोपींकडे, साक्षीदारांकडे अगदी बारकाईने चौकशी केली. घातपाताचा कसला प्रकार नव्हता ह्याची त्यांनी खात्री केली. पोलिस महासंचालकांना मराठीत आणि इंग्रजीमधे रिपोर्ट दिले गेले आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला… शिवीगाळ, मारहाण असा खूप गंभीर स्वरूपाचा गुन्हा नसल्याने आरोपींनाही चार-पाच दिवसांत जामीन मिळाला. मी माझ्या कामाच्या गडबडीत होतो. दुसऱ्याच दिवशी माऊली त्या तीनही आरोपींना घेऊन पोलिस ठाण्यात आला. मला काही समजेना. “काय हो माऊली? परत काय काढले? ” माऊलीने मला हात जोडले. “पाय धरा रे साहेबांचे…” असे म्हणताच ते तिघेजण पुढे येऊ लागले. मी त्यांना तेथेच थांबवले. माऊली म्हणाला, “साहेब, एवढ्या मोठ्या माणसाला पोरांकडून चुकून मारहाण झाली. आम्हाला वाटले आता सारे संपले, पण एवढा प्रचंड दबाव असूनही तुम्ही योग्य तीच कारवाई केली. नाही तर ठरवलंच असतं तर, खोटं रेकॉर्ड तयार करून पोरांचं आयुष्य बरबाद करून टाकलं असतं. यांची फाटकी तुटकी घरं, जमीन विकूनही कायद्याच्या फेऱ्यांतून निसटली नसती. तुमचे उपकार फिटणार नाहीत…” ”मी काय फार मोठं केलं नाही. जे घडले तेच मांडले”, मी बोललो. माऊली बोलला, “आम्ही निघालो आहोत इंदूरला. महाराजांच्या आश्रमात. तिघांना घेऊन भैय्युजी महाराजांच्या पायावर डोक ठेवतो आणि चुकून झाल्या प्रकाराबाबत माफी मागतो.”

… ते पोहोचले महाराजांच्या आश्रमात!
त्यानंतर माऊली शेठ त्या तिघांना घेऊन इंदूरला महाराजांच्या आश्रमात गेले. महाराजांनी मोठ्या मनाने त्यांना माफ केले. नित्यपाठ, देवपूजा, ध्यानधारणा यासाठी दोन दिवस आश्रमात ठेवले. दरम्यानच्या काळात दोन वेळा सुग्रास भोजन, नाश्ता, चहा कमी पडून दिले नाही. निघताना त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले आणि आश्रमासाठी देणगी देण्याची इच्छा बोलून दाखवली. महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले. सन्मार्गाने वागण्याचा सल्ला दिला. आश्रमातील गायींसाठी, गोमातांसाठी केवळ दोन ट्रक चारा पाठवण्याचे काम सांगितले. एवढेच नव्हे तर, त्यांनी दिलेली तक्रारही नंतर रितसर मागे घेतली. अशा प्रकारे एका गंभीर प्रकरणाचा शेवट सुखात झाला. मध्यप्रदेशमधील शुजानपूर येथील एका जमीनदाराच्या घराण्यात १९६८मध्ये जन्म. उच्चशिक्षीत, उच्चविद्याविभूषीत, सुसंस्कृत, रूपसुंदर अशा या रुबाबदार तरुणाची लाईफस्टोरीची अलौकीक होती.

साताऱ्याच्या इंजीनियरिंग कॉलेजमधे शिक्षण घेत असतानाच त्यांना अचानक सिद्धी प्राप्त झाली. ते अध्यात्माच्या क्षेत्रात गेले. सूर्योदय परिवाराची स्थापना केली. इंदूरमधे मोठा आश्रम उभारला. त्यांचा भक्तपरिवार वाढत गेला. भविष्य, सल्ला, समाजकार्य यातून राष्ट्र उभारणीकरिता अलौकीक कार्य केले. अनेक स्थानिक तसेच राष्ट्रीय नेते, उद्योगपती वारंवार त्यांच्याकडे जात. स्थानिक, सामाजिक, राजकीय समस्या निर्माण झाल्यावर त्यातून अनेक वेळा त्यांनी सहभाग घेऊन त्या सोडवल्या. त्यामुळे त्यांना राष्ट्रसंत अशी उपाधी मिळाली. आश्रमाच्या माध्यमातून पूर, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळामधे चारा छावण्या, गरीब, गरजू आदिवासी, पारधी समाज यासाठी प्रचंड कार्य केले. पण, म्हणतात ना अलौकीक सौंदर्य, व्यक्तीमत्व जसं वरदान असतं तसं काही वेळा एखाद्याला शाप ठरतं. भैय्युजी महारांजाबाबत तेच झालं. त्यांची संपत्ती हडपण्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं. ‘हनी ट्रॅप’ रचण्यात आला. शेवटी डिप्रेशनमध्ये त्यांनी १२ जून २०१८ रोजी स्वतःच्या रिहॉल्वरमधून गोळी मारून घेऊन आत्महत्या केली. सगळा देश ही बातमी ऐकून सुन्न झाला. आपल्या मुलाखतींमधून त्यांनी जे सांगितले होते त्याचा प्रत्ययही आला. ते म्हणाले होते, नीती आणि मूल्यं जेथे संपतात तेथे विकृती सुरू होते…

अशोक इंदलकर, पोलिस निरीक्षक
ashokindalkar66@gmail.com

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर

अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!

इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!