आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर
पुणे शहरातील स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि लेखक अशोक इंदलकर यांनी माजी पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांच्यावर लेख लिहीला आहे. मधुकर झेंडे यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज याला कसे पकडले? सविस्तर लेखामध्ये लिहिले आहे….
गाणसम्राज्ञी कै. लतादिदी यांचा मुंबईतील पेडर रोड या अलीशान भागात फ्लॅट आहे. मंगेशकर कुटुंबीय तेथेच ‘प्रभुकुंज ‘ इमारतीत राहायला आहे. पॉश, कॉस्मोपोलीटन एरीया असल्याने मराठीच्या ज्या काही खाणाखुणा असतात त्या तिथे पाहायला मिळत नाहीत. असे असताना त्या ठिकाणी असणाऱ्या एका जाहिरातीच्या बोर्डवर एक अमूलची जाहिरात अनेक दिवस झळकली.. ‘अटकेपार झेंडे ‘. अतिशय चिकित्सक असणाऱ्या दिदी तो मराठी मधील फलक पाहून सुखावल्या. परंतु, त्यांचे कुतुहल मात्र जागे झाले. माहिती घेतल्यावर त्यांना समजले की ती जाहिरात एका झेंडे नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरबाबत आहे. ज्याने चार्लस शोभराजसारख्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला पकडले आहे. मग लता दिदींनी एका मोठया भव्य कार्यक्रमामधे झेंडे साहेबांचा खास सत्कार केला.
त्याच काळातील दुसरा एक प्रसंग असा की, पंतप्रधानांचा ताफा दक्षिण मुंबईतून दादर जुहूकडे चालला होता. पंतप्रधान होते राजीव गांधी. वरळीच्या एका कॉर्नरवर पंतप्रधानांची गाडी थांबली. व्हिव्हीआयपी (राष्ट्रपती, पंतप्रधान वगैरे) कार्केड असा अचानक थांबणे हे व्हीव्हीआयपी साठी धोकादायक असते. त्यामुळे सर्वजण गडबडले. सतर्क झाले. थांबण्याचं कारण म्हणजे बंदोबस्तावर तैनात असलेल्या एका पोलिस इंन्स्पेक्टरला म्हणजेच मधुकर झेंडे साहेबांना त्यांना भेटायचे होते. त्यांच्या सोबतच्या कोणीतरी त्यांना झेंडेंबाबत सांगीतले असावे. पण प्रोटोकॉल प्रमाणे तेथे थांबणे योग्य व सुरक्षीत नाही, इंस्पेंक्टरला नंतर राजभवनावर बोलावू असं त्यांना सांगीतल गेले. नंतर तो सोहळा झाला. परंतु, ती बातमी त्या वेळच्या साऱ्या वर्तमानपत्रात ‘एका पोलिस निरीक्षकाला भेटण्यासाठी पंतप्रधानांचा ताफा रस्त्यात थांबला ‘ अशी मोठी बातमी छापली गेली. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री अरुण नेहरू दिल्लीवरुन एका पोलिस निरीक्षकाला खास भेटण्याकरीता मुंबईला आले. बृहन्मुंबई पोलिस दलातील इतिहासामध्ये असा प्रसंग पहिल्यांदाच झाला असावा. नेमका असा काय पराक्रम केला होता झेंडे साहेबांनी.. त्या काळातल्या सर्वांना माहिती आहे. आता वयस्कर झालेल्या पिढीलाही ही चांगलं आठवत असेल, त्या काळातील एकमेव दूरदर्शनवर पाहिलीही असेल सर्वांनी ती बातमी.
कारण चार्लस शोभराज या दंतकथा बनुन राहिलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला कसलीही चुक, घोडचूक न करता अगदी आपल्या सचिनच्या निर्दोष स्ट्रेट ड्राईव्ह फटक्यासारखे, ‘ओ काकेरो’ या गोव्यामधील हॉटेलात सह्याद्रीच्या वाघासारखी झेप घेऊन मगरमिठीत पकडले ते इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांनी. जपानमधे जाऊन कराटे शिकलेल्या ब्लॅकबेल्ट असलेल्या अत्यंत चपळ गुन्हेगाराला त्यामुळे प्रयत्न करूनही सोबतच्या हॅंड बॅगमधील अत्याधुनिक पिस्तुल पर्यंत पोहचता आले नाही. चार्लस शोभराज हा एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार. एक नाही दोन नाही तर तब्बल 42 सुंदरींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचा उपभोग घेऊन ठार मारणारा नराधम. आजच्या जमान्यात एखाद्या महिलेची हत्या झाली की मिडीया केवढा गदारोळ करतो. 80 च्या दशकात या गुन्हेगाराने 42 महीला ठार केल्या. त्याला बिकीनी किलर हे नाव पडले होते. सुंदर महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. महागडया गिफ्टसची त्यांच्यावर खैरात करायची. त्यांना समुद्र किनारी नेऊन समुद्र स्नान करायला लावायचे. बिकीनीमधील महिलांना कॉफीमध्ये विष घालून प्यायला द्यायचे आणि मृत्यु पावल्यावर त्यांना कारमधील पेट्रोल ओतून जाळून टाकायचे, असे अघोरी कृत्य त्याने केले होते.
जगातील अनेक देशांमध्ये लाखो डॉलर्सची फसवणूक, फिल्मी स्टाईल घरफोड्या, दरोडे, खून केलेला अत्यंत चपळ, चाणाक्ष, सावध व निर्दयी असा गुन्हेगार होता. ‘बारा मुलकों की पुलीस डॉन का इंतजार करती है । डॉन को पकडना मुंमकीन ही नही बल्की नामुमकीन है ।’ … असा एका हिंदी सिनेमामधील प्रसिद्ध डॉयलॉग आहे. शोभराजला मात्र त्याहीपेक्षा जास्त देशात, मुलखात वान्टेड होता. पोलिसांनी पकडला तरी काही ना काही आयडीया वापरून तो पळून जायचा. एका गुन्हयात तो पकडला गेला आणि पोलिसांनी त्याला तिहार सारख्या अतिशय सुरक्षीत जेल मध्ये टाकला. त्या ठिकाणी तो शिक्षा भोगत होता. तेथील सुरक्षा व्यवस्था अतिशय भक्कम होती. भारतात गुन्हे केलेले अनेक नामचीन गुन्हेगार तेथे होते. चार्लस शोभराज तिहार सारख्या जेलमधून जाऊच शकत नाही. अशी खात्री असल्याने सारे निर्धास्त होते. पण शेवटी तो चार्लस शोभराज होता. काही तरी अफलातून कल्पना लढवल्या शिवाय येथून सुटका अशक्य याची त्याला खात्री झाली. त्याने तुरुंगातील साऱ्या यंत्रणेला खूष ठेवण्याची सुरुवात केली. सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनला तो. वर पासून खालपर्यंत सगळयांची जवळीक निर्माण झाल्यावर, एक दिवस त्याने प्लॅन ठरवला. आपला वाढदिवस असून तो साजरा करण्याकरता काही बाहेरचे जंटलमन मित्र केक घेऊन येणार आहेत, असे सांगून परवानगी मिळवली. मग काय ठरवल्याप्रमाणे केक मधे गुंगीचे औषध टाकून त्याचा अमेरिकन मित्र डेव्हिड हॉल विदेशी कार घेऊन आत आला. तुरुंगात धमाल पार्टी साजरी झाली. आणि .. ‘ चार्लस शोभराज सह १६ कैदी तीन अलिशान कारमधून तिहार तुरुंगातून फरार ‘ अशी हेडलाईन हिंदुस्थानच्या च नव्हे तर जगातील साऱ्या न्युज पेपरमधे छापून आली. साऱ्या जगात भारताच्या तुरूंग व्यवस्थेची, न्यायव्यवस्थेची नाचक्की झाली.
चार्लस शोभराजला पकडणं फार मोठं आव्हान होत. बऱ्याच दिवसांनी गुप्तचरांनी बातमी काढली की चार्लस आपल्या साथीदारांसह गोव्यातून बोटीने पळण्याच्या प्रयत्नात आहे. त्यावेळी सुर्यकांत जोग हे महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक होते. त्यांनी शोभराजला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. इन्स्पेक्टर झेंडे यांनी यापूर्वी चार्लस ला पकडल्याची माहिती त्यांना मिळाली. मग त्यांनी झेंडे ना बोलावून ही विशेष कामगीरी सांगीतली. झेंडे साहेबांनी आपले पथक घेऊन गोवा गाठले. चार्लसचा फोटो त्यांच्याकडे होता. गोव्यात चौकशी करत, शोध घेत हे पथक फिरत होत. आत्ता सारखी मोबाईलची सोय त्या काळी नव्हती. परदेशी लोक त्यावेळी पोस्ट ऑफीस वरुन ट्रंक कॉल करून आपल्या घरच्यांशी बोलायचे. तशी सोय गोव्यातील किनाऱ्यावरील ओ काकेरो नावाच्या हॉटेल मध्ये असल्याची माहिती झेंडे साहेबांना मिळाली. त्यांनी मग त्या हॉटेल जवळ फिल्डींग लावली. बाईक टॅक्सी च्या एका पोऱ्याकडून त्यांना पक्की खबर मिळाली की फोटोतील व्यक्ती या हॉटेलात येत जात असते. कारण शोभराज त्याच्या अमेरिकेतील बायकोला हॉटेलमधील टेलीफोन बुथ वरुन फोन लावायचा. झेंडे साहेबांना खात्री झाल्यावर त्यांनी मुंबईवरून आणखी अधिकारी मागवले. आणि हॉटेल मध्ये फिल्डीग टाईट केली. आणि एका संध्याकाळी त्यांच्या सावध नजरेने मोटार बाईकवरून येणाऱ्या शोभराजला हेरले. तसे ते सावध होऊन एका झाडामागे लपले. कारण तो त्यांना ओळखत होता. तो अतिशय चलाख होता, त्यामुळे कसलीही रिस्क त्यांना घ्यायची नव्हती.
हॉटेलच्या आवारातील एका टेबलवर साथीदारासह तो गप्पामारत बसला. त्याच्या मागच्या टेबलवर झेंडे साहेब बसले. त्यांनी एका वेटरला बोलावून बाहेरच्या अधिकाऱ्यांना आत येऊन कोणी काय करायचे अशी चिठ्ठी दिली. वेळ घालवून उपयोग नव्हता. शोभराज सावध व्हायच्या आत त्यांनी शोभराजला पाठीमागून मिठी मारली. तसा तो ओरडला, ” ए .. s.s, व्हॉट आर यु डुईंग ? “त्यावर झेंडे साहेब ओरडून म्हणाले, ” चार्लस डोंट मुव्ह. आय अँम सेम इन्स्पेक्टर झेंडे हू यु कॉट बिफोर ” त्याला जस कळाल की पोलिसांनी आपल्याला पकडल आहे. तसा तो टेबलावरील बॅगेतील पिस्तुल घेण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु, झेंडे साहेबांची मगरमिठी एवढी घट्ट होती की त्याला काहीही हालचाल करता येत नव्हती. दरम्यान बाहेरचे पोलिस आत आले आणि चार्लसला ताब्यात घेतले. तेथे अजिबात वेळ न दवडता आरोपीला कारमधे घालून मुंबईकडे घेऊन आले.
चार्लस शोभराज सारख्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला पकडल्यामुळे मधुकर झेंडे यांचे नाव गाजले. सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय न्युज पेपर मधे शोभराजला गोव्यामधील ओ काकेरो हॉटेल मध्ये मुंबईच्या इन्स्पेक्टर झेंडेंनी पकडल्याच्या बातम्या तिखटमिठ लाऊन छापून आल्या. दुरदर्शनवर दाखवल्या गेल्या. ‘अटकेपार झेंडे’ अशी कल्पक जाहीरात भरत दाभोळकरांनी अमूलच्या पोस्टरवर झळकवली. मुंबई पोलिसांच्या शिरपेचात मानाचा आंतरराष्ट्रीय तुरा खोवला गेला. शोभराजला पकडला एवढ्यावरच झेंडे साहेबांच कर्तॄत्व संपल अस नाही. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक चांगली काम केली. पोलिस अधिकारी म्हणून एखादी व्यक्ती कशी असावी याचा ते एक उत्तम उदाहरण आहेत. १९९२ – ९३ च्या मुंबई दंगलीमधे १२ पोलिसांना वायरलेस मोबाईल व्हॅन सह जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लीम जमावासमोर जाऊन त्यांनी हे अघोरी कृत्य रोखण्याची नम्रपणे विनंती केली. सुडाने बेफाम झालेला एवढा मोठा जमावही या एका पोलिस अधिकाऱ्याच्या विनंतीला मान देऊन थांबला. पोलिसांविरोधात असूनही त्यांनी झेंडेंसाहेबांना एकट्याला सोबत घेऊन दंगलीमधील माथी भडकलेली ते मुस्लीम तरुण नागपाडयाच्या अरुंद गल्लीमधे त्या व्हॅन पर्यत गेले आणि मृत्युच्या महाभयंकर संकटाने थरथर कापणाऱ्या पोलिसांना दिलासा दिला आणि व्हॅनसह त्यांना सुखरूप बाहेर काढले. कारण काय तर झेंडे साहेबांची स्थानिक समाजात असणारी प्रतिमा.
साऊथ मुंबईमधे मुस्लीम बहुल एरीयामधे त्यांची अनेक वर्ष सेवा झाली. एक निगर्वी, निरपेक्ष, नितिमान व्यक्ती जी धर्मनिरपेक्षपणे काम करते, कसलाही दुजाभाव करत नाही. हिंदू असूनही ज्याने पवित्र कुराणाचा अभ्यास केला आहे. अनेक मुस्लीम तरुणांना वठणीवर व वळणावर आणले. त्यांच्या अनेक मुलाखतींमधे ते एका विचारवंताच मुखोद्गत वाक्य सांगतात. ‘ …. झेंडे साहेब आजही सांगतात की त्यांनी अगदी निरपेक्षपणे कसलाही भेदभाव न करता, जात धर्म न पाहता लोकांना मदत केली, सहकार्य केलं. आवश्यक तेथे लाठीचा, काठीचा आणि पिस्तुलातील गोळीचाही वापर केला. त्यांच्या काळात म्हणजे ones upon time in mumbai गॅगवार मधील कुप्रसिद्ध एक से बढकर एक अशा अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यामध्ये टायगर मेमन, हाजी मस्तान, करीमलाला, अमरना बाबुरेशीम, अरूण गवळी असे खतरनाक गुन्हेगार मंडळी आहेत.
दगडी चाळीमधील गवळी गॅंगवर कठोर कारवाई केल्यामुळे झेंडे साहेबांवर चिडलेल्या गवळीने सामनामधे, ‘हिरवा झेंडे’ असा अग्रलेख दै. सामना मध्ये छापून छत्रपतींचे नाव घ्यायची लायकी नाही वगैरे चिखलफेक केली होती. त्यावेळी झेंडे साहेबांनी उद्वेगाने बाळासाहेबांना जाहीर पत्र लिहले होते. छत्रपती मला सदैव वंदनिय आहेत. पुणे जिल्हयामधील किल्ले पुरंदरच्या परिसरातीलच झेंडेवाडीचा मी आहे. महाराजांबद्दल तुम्ही मला काय शिकवता ? १९२०-२५ च्या काळात पुण्यामधे शिवछत्रपतींचा पुतळा कदाचीत जगातील पहिला भव्य पुतळा बनवायची कल्पना माझ्या आजोबांची होती, त्यासाठी त्यांनी अनंत खस्ता खाल्या. पैसे कमी पडले तर आम्ही आमची घरे दारे विकू पण राजांचा पुतळा उभा कर .. जेधे, जवळकर, मोरे वगैरेंना घेऊन सार्वजनिक वर्गणी जमा केली. राजर्षी शाहू महाराजांची मदत घेतली. आजच्या ऐवढी त्या काळात शिवाजी महाराजांबद्दल जागरुकता नव्हती. काही कर्मठ पुणेकरांचा पुतळा ऊभा करायला जाहीर विरोध केला होता. नंतर महात्मा फुले, लोकमान्य टिळक या समाज सुधारकांनी महाराजांबाबत जागृती केली. वगैरे वगैरे.. झेंडे साहेबांचे हे पत्र वाचून दिलदार बाळासाहेंबांनी ते दै. सामनात जसेच्या तसे छापले. नंतर बाळासाहेबांनी त्यांना बोलावून त्यांचा खास सत्कारही केला .. काळाच्या ओघात या गोष्टी विस्मरणात गेल्या होत्या…
पण नेपाळमधील दोन मर्डर केस मधे चार्लस शोभराज शिक्षा संपवून तुरुंगाबाहेर आला. त्याची बातमी मग मीडीयामध्ये आली. भारतात झेंडे साहेबांनी त्याला गोव्यामधील ओ काकेरो हॉटेल मधे नाटयमयरित्या कसा पकडला वगैरे वगैरे बातम्यांना परत उजाळा मिळाला. झेंडे साहेबांबाबत परत आजच्या अति जागृत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक या आवळ्या जावळ्या मिडीया मधे झळकू लागले. पुण्यातच राहावयास असल्याने पत्रकारांनी, मुलाखतकारांनी त्यांना परत घेरले आणि एकेकाळी प्रचंड गाजलेलं व्यक्तीमत्व ज्यांच्या कारकीर्दीवर वृत्तपत्र, मासिकं, रंगली. टीव्ही सिरीयल निघाल्या, फिल्म निघाल्या, बायोपिक निघताहेत. अशा निर्व्यसनी, निस्पृह, निगर्वी व्यक्तीमत्व असलेल्या, रोज १० कि मी नियमीत चालणाऱ्या, मुलामुलीकडे न्युझीलंड पासून अमेरिकेपर्यंत सतत प्रवास करणाऱ्या, वयाची फक्त 83 वर्ष झालेल्या ताठकण्याच्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला या निमित्ताने माझे एक पुस्तक घेऊन प्रत्यक्ष भेटायला गेलो. कारण जवळचे नातेवाईक असल्याने एरव्ही भेटतच होतो. पण मी त्यांच्यावर लिहणार आहे. एक पोलिस अधिकारी म्हणून त्या अॅन्गलमधून लिहणार असल्याने त्यांनी खात्यामधील काही खास गोष्टी ऐकवल्या, सांगीतल्या. पवित्र कुराण, ख्रिस्ती तत्वे, भगवद्गीतेमधील तोंडपाठ अध्याय यांची पेरणी करुन, वयाची साठी नाही तर ऐंशी ऊलटूनही खास मुंबई पठडीमधील ओघवत्या भाषाशैलीत त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या अनेक घटना व थरारक प्रसंग मधे काहीही न विसरता, अडखळता सांगीतल्या त्या ऐकून कान व मन अक्षरशः तृप्त झाले.
खंडणीखोर तसेच वादग्रस्त, प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊन पोलिसींग दाखवणारे शो मॅन वाचीवीर, गुन्हेगारांशी साटेलोटे करुन प्रचंड माया जमवणारे वादग्रस्त एन्काऊंटर किंग असे पोलिस अधिकारी हा जमाना पाहतो, वाचतो, ऐकतो. पण शौर्य म्हणजे काय, धाडस म्हणजे काय, विद्वत्ता आणि नितिमत्ता म्हणजे काय हे वयाची ८३ वर्ष पुर्ण केलेल्या या तरुण व अजूनही तडफदार अधिकाऱ्याला भेटून समजले. आजच्या आमच्या खात्यातील पोलिसांसाठी काय संदेश द्याल असे विचारले असता त्यांनी गोड हसून एक दिर्घ पॉज घेतला. संदेश म्हणून शैलीदार इंग्रजीमधे त्यांनी एका प्रसिद्ध विचारवंताचा दाखला दिला. ते म्हणाले. ‘No police man can be successful without willing and active support of people’ समाजाचा सक्रीय पाठिंबा असल्याशिवाय कोणताही पोलिस यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी पोलिस स्टेशनला अडचणीत आलेली व्यक्ती आल्यास त्याची जात, पत व धर्म न पाहता निस्पृह, निरपेक्षपणे कायद्याची मदत दिली तरच ते शक्य आहे..
– अशोक इंदलकर
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पुणे
ashokindalkar66@gmail.com
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?