माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर…
मुंबईः व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.
माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत नियमित जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन त्यांना दिला गेला होता. त्यानंतर प्रदीप शर्मा पुन्हा सरेंडर झाले होते. अशातच आता याच कारणावरुन त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे.
दरम्यान, अँटिलिया प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक केली होती. आपला माजी सहकारी सचिन वाझे याला मदत केल्याचा आरोप प्रदीप शर्मांवर करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली SUV सापडली होती. ही एसयूव्ही ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांची होती. त्यानंतर काहीच दिवसांत मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च 2021 रोजी ठाण्यातील खाडीतून सापडला होता. याप्रकरणी प्रदीप शर्माला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती.
माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते आणि दावा केला होता की, याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. तर प्रदीप शर्मा हेच मनसुख हिरेन यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचा एनआयएचा आरोप आहे. अंबानी कुटुंबाला घाबरवण्याचा कट मनसुख हिरेन यांना माहीत होता, त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे.
दरम्यान, ‘मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांचाही हात होता. अंबानी कुटुंबासह इतरांना धमकावण्याचा जो कट रचण्यात आला होता. याच कटाची संपूर्ण माहिती मनसुख हिरेन यांना माहित असल्याने त्यांची हत्या करण्यात आली. मनसुख हिरेन यांना अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेल्या कारबाबत संपूर्ण माहिती होती. तसेच, आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरेन यांच्यामार्फत केलेल्या कृत्याचा पर्दाफाश होण्याची भिती होती, त्यामुळेच हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यात आला,’ असा दावा एनआयएने केला होता.
धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…
अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…
महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…
पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…