Video: कंबलवाले बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा; कारवाईची मागणी…

मुंबई : मुंबईत सध्या कंबलवाल्या बाबाची जोरदार चर्चा सुरू असून, व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलांना नको तिथं हात लावत आहे. हे गंभीर आहे. त्यामुळे विनयभंगाचा देखील गुन्हा व्हायला हवा, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

कंबलवाले बाबा विकलांग रुग्णांच्या अंगावर रग किंवा घोंगडी टाकून त्यांच्यावर उपचार करुन त्यांना ठणठणीत बरं करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. घाटकोपरमध्ये मागील चार दिवसांपासून कंबलवाल्या बाबाचं शिबीर चालू आहे. भाजप नेते राम कदम यांनी दही हांडीच्या कार्यक्रमात या बाबाच्या शिबिराबाबत घोषणा केली होती. त्यांच्या पत्नीला बाबाच्या उपचाराचा फायदा झाला म्हणून आपण या शिबिराचे आयोजन करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

कंबलबाबा कंबल टाकून रुग्णांवर उपचार करत असल्याचे अनेक व्हिडीओ राम कदम यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. या भोंदू बाबावर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात येत आहे. ‘राजस्थानमधून कंबलवाले बाबा नावाची एक व्यक्ती सध्या आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात आली असून या ठिकाणी विकलांग लोकांना बरे करण्याचा त्यांच्या वतीने दावा करण्यात येत आहे. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा लागू आहे, त्या कायद्यान्वये अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी, आम्ही या निमित्ताने पोलिसांना ही कारवाई त्वरित करण्याची करण्याची मागणी’ अनिंस सदस्य मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे.

‘राम कदम आणि कंबलवाले बाबा या दोघांवर तात्काळ जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा. हा तोच आमदार आहे ज्याने मुलीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता याने त्या बाबाला आणलं आहे आणि तो महिलांना नको तिथं हात लावत आहे. हे गंभीर आहे. त्यामुळे विनयभंगाचा देखील गुन्हा व्हायला हवा. मी स्वतः घाटकोपर पोलीस ठाण्यात जाणार आहे आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणार आहे,’ असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत गृह विभागाने यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहीलं आहे की, ‘अर्धांग वायू सारखे आजार ठिक करण्याचा दावा करणाऱ्या कंबलवाले बाबाला आपल्या मतदारसंघात आणून आमदार राम कदम हे शिबिराचे आयोजन करत असल्याचे सोशल मीडियातून समजले. एक बाबा अंगावर घोंगडी टाकून आजार बरा करतो अशा अंधश्रद्धांना लोकप्रतिनिधीकडून पाठिंबा मिळणे दुर्दैवी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी गृह विभागाने कठोर पावले उचलली पाहिजेत.’

दरम्यान, राम कदम यांनी कंबलवाल्या बाबाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा मी मानत नाही. मला आधी कळलं तेव्हा मला स्वतःला वाटलं होतं हे (बाबा) ढोंगी आहे. पण, मी स्वतः कंबलवाल्या बाबांच्या कॅम्पला गेलो. माझ्या आईवडील आणि मित्रांना घेऊन गेलो त्यांना आराम मिळाला. मग माझ्या लक्षात आले की, हे बाबा अंधश्रद्धा पसरवत नाहीत तर, त्यांना नसांची माहिती असल्याने जागच्या जागी रुग्णाला आराम मिळतो. वॉकर घेऊन आलेले माणूस चालत गेलेत, व्हील चेअरचा माणूस ते चालायला लावतात. मला वाटतं तुम्ही त्यांचे युट्युबचे व्हिडीओ बघा आणि अनुभव घ्या. जर अनुभव घेतल्यानंतर देखील तुम्हाला वाटलं ही अंधश्रद्धा आहे तर, मग जरूर बोला. माहिती न घेता हे बोलणे योग्य नाही. माझ्या घाटकोपरमध्ये मागील पाच दिवसात हजारो नागरिकांना याचा फायदा झाला आहे.’

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…

इंदुरीकर महाराज यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका…

भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!