
निर्दयी! बाळाच्या तोंडात बोळा कोंबून फेकले झुडपात; पण…
छत्रपती संभाजीनगर: अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक) तोंडात बोळा कोंबून आणि कॅरीबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे.
शहरातील कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिर- जवळील ही घटना असून, बाळाची प्रकृती ठीक असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तर बाळाला फेकून देणाऱ्या अज्ञात माता-पित्यांविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर गुरुवारी (ता. 26) हा प्रकार समोर आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलदार विलास चव्हाण फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिराजवळील झुडपामध्ये एक बाळ रडत असल्याचा कॉल आला. त्यांमुळे चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तेथे दोन महिला हजर होत्या. त्यांपैकी एकीच्या हातात पाच ते सात दिवसांचे पुरुष अर्भक होते. अधिक माहिती घेतल्यावर हे अर्भक येथील झुडपात फेकून दिल्याचे आढळल्याचे महिलांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी अर्भकाला उपचारासाठी घाटीत दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणाचा अधिक तपास सहायक निरीक्षक डॉ. विशाल इंगळे करीत आहेत.
कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिर- जवळ अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक) तोंडात बोळा कोंबून आणि कॅरिबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून देण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या बालकाच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. एक महिला पिशवी घेऊन आली होती. जाताना तिच्याकडे पिशवी नव्हती, अशी माहिती त्या भागातील लोकांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिस पुढील तपास करत आहे.