गुढ वाढले! वसतीगृहात युवतीची हत्या अन् सुरक्षा रक्षकाची आत्महत्या…
मुंबई : चर्चगेट परिसरात असलेल्या सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात युवतीची हत्या करून वसतीगृहाच्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीवर अतिप्रसंग करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात चौथ्या मजल्यावर तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर हॉस्टेलचा सुरक्षा रक्षक बेपत्ता होता. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सुरक्षा रक्षकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्या केल्यानतंर सुरक्षारक्षकाने चर्नी रोड स्थानकात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ओमप्रकाश कनोजिया असे त्याचे नाव आहे. गेल्या १८ वर्षांपासून तो वसतीगृहात सुरक्षारक्षकाचे काम करत होता. पीडितेवर अतिप्रसंग करून त्याने तिची हत्या केली आणि स्वत: रेल्वेखाली उडी मारत जीव दिला.
युवती हत्येनंतर फरार झालेला सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया याचा मोबाईल इमारतीत सापडला होता. आता त्याचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पोलिसांकडून प्राथमिक चौकशी केली जात आहे. ओमप्रकाशने बलात्कार केल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.