
हनी ट्रॅप! श्रीमंतांना लक्ष्य करून लॉजवर बोलवायची अन् बाथरूममध्ये जाताच…
बेळगाव: श्रीमंत व्यक्तींना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या फॅशन डिझायनर महिलेला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली असून, जवळपास 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथील रहिवासी दीपा अवतगी (वय 33) या महिलेस अटक करण्यात आली आहे, तर तिचा मित्र शिवानंद मठपती फरार आहे.
शिवानंद हा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी आहे. दीपा आणि तो मिळून लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटत असत. शिवानंद हा दीपा हिला श्रीमंत लोकांबद्दल माहिती पुरवत असे. त्यानंतर, आरोपी दीपा इंस्टाग्राम आणि फेसबुकद्वारे श्रीमंत लोकांशी ओळख करून नंतर ती अश्लील गप्पा मारत असे आणि त्यांना बेळगाव शहरातील एका लॉजला भेट देण्यासाठी आमंत्रित करत असे, अशा रितीने दोघे श्रीमंत व्यक्तींना लूटत होते.
दीपाच्या बोलवण्यावरुन लॉजमध्ये येणाऱ्या व्यक्तीला दीपा आंघोळ करुन परत येण्यास सांगायची आणि तो बाथरूममध्ये जाताच ती बाहेरुन दरवाजा बंद करायची. त्यानंतर, ती संबंधित व्यक्तीचा मोबाईल, पैसे आणि गाडीच्या चाव्या चोरून पळून जायची. तिची ही दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. बाथरूममध्ये अडकलेल्या व्यक्तीला ती वेगळ्या नंबरवरून फोन करुन पैशाची मागणी करायची. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी बेळगाव टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दीपा हिला अटक केली आहे.
पोलिसांनी एकूण 32 लाख 86 हजार रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. त्यामध्ये एक फॉर्च्युनर कार, एक मारुती सुझुकी, एस-क्रॉस कार, 11 मोबाईल फोन, एक टॅब, एक डोंगल, तीन गाडीच्या चाव्या आणि 14 हजार रुपये रोख रक्कम समाविष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अन्…
हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…
पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…
वृद्ध व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले; एका खोलीत घेऊन गेली अन्…

