एअर इंडियाच्या कोलकाता-मुंबई विमान अपहरणाची धमकी; उड्डाणापूर्वी शौचालयात सापडली चिठ्ठी…

कोलकाताः बुधवारी सकाळी एअर इंडियाच्या कोलकाता-मुंबई विमानाला अपहरणाची धमकी मिळाली. विमानाच्या स्वच्छतागृहात सापडलेल्या एका चिठ्ठीत म्हटले होते, की सकाळी ११:१० वाजता विमानाचे अपहरण केले जाईल. चिठ्ठी मिळताच, विमानातील कर्मचाऱ्यांनी वैमानिकाला याची माहिती दिली, ज्याने तात्काळ हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला सतर्क केले. त्यानंतर विमानाला कोलकाता विमानतळावरील विलगीकरण कक्षात नेण्यात आले, तिथे सुरक्षा यंत्रणांनी विमानाची तपासणी केली. विमानात ९३ प्रवासी आणि पाच कर्मचारी होते.

एअर इंडियाचे एअरबस ए ३२० निओ विमान कोलकाताहून मुंबईला जाण्यासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना, विमानातील एका कर्मचाऱ्याला स्वच्छतागृहात एक धमकीची चिठ्ठी आढळली. विमानतळ प्रशासनाने या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. हे विमान विस्ताराच्या रंगात कार्यरत होते.

दुसऱ्या एका घटनेत बंगळूरुहून लखनौला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट ६ ई-४५१ ला शनिवारी अपहरणाची धमकी मिळाली. विमानातील कर्मचाऱ्यांना ती धमकीची चिठ्ठी शौचालयात आढळली. त्यानंतर पायलटने विमान बंगळूरुला परत आणले. बंगळूरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली.

फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-२०३० या विमानाने १३ ऑक्टोबर रोजी सकाळी जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) विमानातून अपहरणाचा संकेत मिळाला होता.

विमान सुमारे ४५ मिनिटे हवेत होते. प्राथमिक तपासात असे दिसून आले की वैमानिकाने चुकून सतर्कतेचा संदेश पाठवला होता. मात्र, चौकशीदरम्यान त्याने सांगितले, की ही आपली चूक नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!