
कोलकाता-मुंबई एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याच्या धमकीप्रकरणी एका संशयित प्रवाशाला अटक
कोलकाता: कोलकाताहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपहरणाची धमकी मिळाल्याप्रकरणी एका प्रवाशाला ताब्यात घेऊन विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळातर्फे (एनएससीबीआय) आज (ता. १२) जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्याला दुजोरा देण्यात आला आहे. बुधवारच्या घटनेसंदर्भात प्रवाशाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलीस ठाण्यात सोपवण्यात आले आहे.
एअर इंडियाचे विमान ‘एआय २७७२’ बुधवारी सकाळी कोलकाताहून मुंबईसाठी निघणार होते. उड्डाण होण्यास अवघी काही मिनिटे बाकी असताना, विमानाच्या स्वच्छतागृहात अपहरणाची धमकी देणारा एक संदेश मिळाला. सकाळी सुमारे १०:३७ वाजता केबिन क्रूला ही चिठ्ठी दिसली. सुरक्षा प्रोटोकॉल तत्काळ सक्रिय करण्यात आली आणि विमानाचे उड्डाण थांबवून ते विलगीकरण कक्षात नेण्यात आले.
विमानातील सर्व १०५ प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विमान, प्रवासी आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सर्व आवश्यक सुरक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विमानाला उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली.
विमान नियोजित वेळेपेक्षा जवळपास सात तास उशिरा, सायंकाळी ५:३८ वाजता मुंबईसाठी रवाना झाले. एका प्रवाशाला अटक करून त्याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळे तपासाला नवीन वळण लागले आहे. तथापि, जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात अटक केलेल्या प्रवाशाची ओळख किंवा धमकी देण्यामधील त्याच्या कथित भूमिकेबद्दल कोणताही तपशील देण्यात आलेला नाही.

