
लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने केजरीवाल आणि मुलीला ठार मारण्याच्या धमक्या; ७ कोटींच्या खंडणीची मागणी…
नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या हर्षिता नावाच्या मुलीला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने ठारमारण्याची धमकी मिळाली असून, धमकी देणाऱ्याने ७ कोटी रुपये खंडणीची मागणी केली आहे.
टिळकनगरचे आमदार जरनैल सिंग यांना धमकीचे फोन आणि व्हॉट्सॲप संदेश आल्यानंतर, त्यांनी ६ नोव्हेंबर रोजी मोहाली येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, धमकीचा संदेश पाठवणाऱ्याने आपण लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला. पैसे न दिल्यास केजरीवाल आणि त्यांची मुलगी हर्षिता केजरीवाल या दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिली.
मोहाली पोलिसांनी तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर क्राईम पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
आरोपी आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाईची मागणी करत, टिळकनगरच्या आमदाराने पोलिसांना माहिती दिली आहे की, केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला खंडणीची मागणी आणि ठारमारण्याची धमकी पोचवण्यासाठी आपला मध्यस्थ म्हणून वापर करण्यात आला आहे.
पोलिसांना आरोपीने वापरलेल्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), आयपी लॉग्स आणि लोकेशन ट्रेस मिळवण्याची विनंती केली आहे. त्यांनी पोलिसांना आरोपीशी संबंधित इतर व्यक्तींना ओळखून अटक करण्याचे आणि केजरीवाल व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी संबंधित सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधण्याचे आवाहनही केले आहे. तक्रारीसोबत धमकीच्या व्हॉट्सॲप संदेशाचा स्क्रीनशॉटही पोलिसांना सादर करण्यात आला आहे.

