
महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यातील ‘किंगपिन’ सौरभ चंद्रकारला सीबीआय न्यायालयाने पाठवले तुरुंगात
रायपूर: ६,००० कोटी रुपयांच्या महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप घोटाळ्याचा कथित सूत्रधार सौरभ चंद्रकर याला, रायपूर येथील विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती, त्याच्या वकिलांनी दिली.
या महिन्याच्या सुरुवातीला ओमानमधून प्रत्यार्पित करण्यात आलेल्या चंद्रकार याला, केंद्रीय गुप्तचर संस्थेतील आठ दिवसांची कोठडी संपल्यानंतर विशेष न्यायाधीश (सीबीआय) मनोज कुमार सिंह ठाकूर यांच्यासमोर हजर करण्यात आले, अशी माहिती त्यांचे वकील तुषार गिरी यांनी रायपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोने आरोपीच्या पुढील कोठडीची मागणी केली नाही, त्यानंतर न्यायालयाने बेटिंग ॲपचे सह-प्रवर्तक चंद्रकार याला १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली, असे त्यांनी सांगितले. त्याला रायपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येईल.
दरम्यान, या प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या पैलूची चौकशी करणाऱ्या अंमलबारी संचालनालयाने (ईडी) चंद्रकार याच्याविरुद्ध यापूर्वी जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळला होता, असे गिरी यांनी सांगितले. ईडीचे वकील सौरभ कुमार पांडे म्हणाले, की मनी लाँडरिंग प्रकरणात चंद्रकार याच्या अटकेसाठी एजन्सी आता पीएमएलए (मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा) न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे.
ओमानमधून प्रत्यार्पण केल्यानंतर, चंद्रकार याला ४ नोव्हेंबर रोजी रायपूरच्या सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे केंद्रीय तपास यंत्रणेला त्याला आठ दिवसांची कोठडी मंजूर करण्यात आली आणि चौकशीसाठी दिल्लीला नेण्याची परवानगी देण्यात आली होती.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, तपासात असे उघड झाले, की महादेव ऑनलाइन बुक हे देशातील सर्वांत मोठ्या अवैध ऑनलाइन सट्टेबाजी सिंडिकेटपैकी एक होते, जे फ्रँचाइज्ड पॅनेल आणि शाखांच्या नेटवर्कद्वारे भारताबाहेरून चालवले जात होते. तपास यंत्रणेने म्हटले आहे, की या प्लॅटफॉर्मने देशभरातील आपल्या नेटवर्कद्वारे वापरकर्त्यांची नोंदणी करून आणि पैज गोळा करून, क्रिकेट, फुटबॉल, पत्त्यांचे खेळ आणि इतर कार्यक्रमांवर सट्टेबाजी सुलभ केली.
अवैध सट्टेबाजीमधून मिळालेला पैसा अनेक बनावट बँक खात्यांमार्फत, विविध व्यवहारांमधून वळवला जात होता आणि हवाला मार्गांनी परदेशात हस्तांतरित केला जात होता. या टोळीचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय चालावे यासाठी, यातील काही पैसा सरकारी अधिकाऱ्यांना खंडणी देण्यासाठीही वापरला जात असल्याचा आरोप आहे.
महादेव ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा ईडी स्वतंत्रपणे तपास करत आहे. हे प्रकरण छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात (२०१८-२३) उघडकीस आले होते. ईडीने यापूर्वी दावा केला होता की, त्यांच्या तपासात या मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्यातील अनेक उच्चपदस्थ राजकारणी आणि नोकरशहांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर, राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने मार्च २०२४ मध्ये ईडीच्या अहवालाच्या आधारे, या प्रकरणात गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा वापर करून एफआयआर दाखल केला होता.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बघेल, ॲपचे प्रवर्तक रवी उप्पल, सौरभ चंद्रकार, शुभम सोनी आणि अनिल कुमार अग्रवाल यांच्यासह इतर १४ जणांना ईओडब्ल्यूच्या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते.
ऑगस्ट २०२४ मध्ये, राज्य सरकारने विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले कथित बेटिंग ॲप घोटाळ्याशी संबंधित ७० खटले, तसेच एक ईओडब्ल्यू प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केले. ईडीने या कथित घोटाळ्यातील गुन्हेगारीतून मिळालेली रक्कम सुमारे ६,००० कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला असून, या सिंडिकेटशी संबंधित अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्याचे रहिवासी असलेला चंद्रकार आणि सहआरोपी रवी उप्पल यांनी कथितरित्या महादेव बुक ॲपचा प्रचार केला आणि पॅनेल व शाखा ऑपरेटर्सच्या नेटवर्कद्वारे ऑनलाइन सट्टेबाजी चालवली.
अवैध सट्टेबाजीतून मिळालेला पैसा संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाठवण्यासाठी कमिशनच्या आधारावर शेकडो बँक खाती उघडण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपी दुबईतून हे सिंडिकेट चालवत होते. दुबईला त्यांचे मुख्य कार्यालय म्हटले जाते आणि त्यांनी छत्तीसगडमधील मोठ्या संख्येने तरुणांना व्यवस्थापक म्हणून कामावर ठेवले होते, असे एजन्सीने म्हटले आहे.

