
महाराष्ट्राचे भाग्य! महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी डॉ. सदानंद दाते…
महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी एखाद्या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्याची नियुक्ती होणे ही शासनाच्या दैनंदिन कामकाजातील एक प्रशासकीय प्रक्रिया मानली जाते. बहुतांश वेळा अशा नियुक्त्या राजकीय सोयीसाठी किंवा केवळ सेवाज्येष्ठतेच्या आधारे केल्या जातात. मात्र डॉ. सदानंद दाते यांची नियुक्ती ही केवळ प्रशासकीय बाब नसून, त्या पदाचा लौकिक, मान आणि प्रतिष्ठा वाढवणारी एक ऐतिहासिक घटना आहे. महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे हे खरोखरच भाग्य आहे….
डॉ. सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेतील (IPS) अधिकारी आहेत. पोलिस सेवेत जवळपास ३२ वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे सदानंत दाते यांच्या तपासातून समोर आले.
डॉ. सदानंद दाते यांची ओळख अत्यंत सरळमार्गी, न्यायनिस्पृह, कडक शिस्तप्रिय, निर्भीड, नॉन-करप्ट आणि धाडशी अधिकारी अशी आहे. कोणताही राजकीय, सामाजिक किंवा अन्य प्रकारचा दबाव न स्वीकारता कायद्याच्या चौकटीत ठामपणे काम करणाऱ्या अशा अधिकाऱ्याची निवड करणाऱ्या राजकीय सूत्रांचेही मनापासून कौतुक करावे लागेल.
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थितीचा सखोल अभ्यास असलेला, सर्वसामान्य जनतेबद्दल विशेष कळवळा असलेला आणि विशेषतः ज्या विभागाचे नेतृत्व करायचे आहे त्या महाराष्ट्र पोलिस दलातील सामान्य पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेणारा असा नेता आज पोलिस दलाच्या शिखरस्थानी आहे. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये त्यांनी थेट काम केले असो किंवा नसो, दातेसाहेब सर्वांना प्रिय आहेत.

“मी पाहिलेल्या काही उत्कृष्ट अधिकाऱ्यांपैकी सदानंद दाते हे एक आहेत. त्यांनी महाराष्ट्र पोलिस महासंचालकपद भूषवावे,” असे गौरवोद्गार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त व ‘सुपरकॉप’ म्हणून ओळखले जाणारे श्री. ज्युलियस रिबेरो यांनी काढले होते. या एका वाक्यात दातेसाहेबांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व सामावलेले आहे.
२६/११ चा मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ला देश कधीही विसरू शकणार नाही. अत्याधुनिक मशीनगन्स आणि हॅण्डग्रेनेड्स घेऊन आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला चढवला. त्या संकटाच्या काळात काही उच्चपदस्थ अमराठी अधिकारी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपून बसले, तर काहींनी प्रसिद्धी मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. याउलट अनेक मराठी अधिकारी व कर्मचारी निधड्या छातीने रस्त्यावर उतरले आणि अतिरेक्यांशी प्राणपणाने लढले. ही दृश्ये संपूर्ण देशाने दूरचित्रवाणीवर पाहिली.
या हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळस्कर यांच्यासह अनेक अधिकारी व जवान शहीद झाले. कामा हॉस्पिटलवर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करत हल्ला चढवला, तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉ. दाते आपल्या पथकासह केवळ सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन तेथे धावले. महिला व लहान मुलांना ओलीस धरलेल्या अतिरेक्यांवर त्यांनी अतुलनीय धैर्याने गोळीबार केला. मशीनगन्सचा मारा आणि हॅण्डग्रेनेड्सच्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले, रक्त सांडत असतानाही त्यांनी रुग्ण, महिला आणि मुलांना सुरक्षित बाहेर काढले. कर्तव्यावरील अशी निष्ठा आणि शौर्य दुर्मीळच आहे.
पुण्यातील एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गरिबीतही वृत्तपत्र टाकणे व इतर छोटी-मोठी कामे करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आय.सी.डब्ल्यू.ए.सारखा अवघड अभ्यासक्रम पूर्ण करून पुणे विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आय.पी.एस. अधिकारी झाले. पुढे त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या.
दहशतवादविरोधी लढ्यासाठी त्यांनी अमेरिकेत विशेष कठोर प्रशिक्षण घेतले आणि मुंबईत ‘फोर्स वन’ या विशेष कमांडो पथकाची स्थापना केली. मागील वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात ते राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चे प्रमुख होते. या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास त्यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक आणि निर्भीडपणे पार पडला. कोणताही वाद, आरोप किंवा दबाव न स्वीकारता “दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणी” करणारी कायदेशीर कारवाई झाली, यावर सर्वांचा विश्वास होता.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगत राज्य आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे येथे कायद्याचे अधिराज्य आहे. मजबूत कायदा व सुव्यवस्थेशिवाय कोणतीही प्रगती शक्य नाही, आणि ही जबाबदारी पोलिस खात्यावर आहे. कितीही आरोप झाले तरी कोरोना काळात आणि २६/११ च्या हल्ल्यात पोलिसांनी कर्तव्य कसे निभावले, हे महाराष्ट्राने पाहिले आहे.
आज देश आणि राज्यासमोर अनेक गंभीर आव्हाने उभी आहेत. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. जगभर युद्धे, ड्रोन आणि मिसाइल हल्ले सुरू आहेत. निष्पाप भारतीय पर्यटकांवर हल्ले करणारा पाकिस्तान सूडाने अधिकच पेटलेला आहे. सायबर हल्ले, सागरी हल्ले, दहशतवादी कारवाया, बेकायदेशीर घुसखोरी, ड्रग्ज व शस्त्रतस्करी, धार्मिक व जातीय तणाव पसरवण्याचे प्रयत्न अशी अनेक संकटे महाराष्ट्रावर घोंगावत आहेत. अशा काळात निस्पृह, निर्भीड, कर्तव्यकठोर, दूरदृष्टी असलेल्या आणि देश-राज्याचा सर्वांगीण अभ्यास असलेल्या डॉ. सदानंद दाते यांच्या हाती महाराष्ट्र पोलिस दलाचे नेतृत्व जाणे हे खरोखरच महाराष्ट्राचे अहोभाग्य आहे.
– अशोक इंदलकर,
सहाय्यक पोलिस आयुक्त (से. नि.)
ashokindalkar66@gmail.com
पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे दिल्लीत प्रकाशन!
गवान महादेवाने राक्षस त्रिपुराचा केलेला वध हा एक प्रकारचा एन्काऊंटरचः अशोक इंदलकर
पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन!
अशोक इंदलकर यांची अपर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती!
पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…
भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

