हृदयद्रावक! नवदाम्पत्य बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले अन्…

सांगली: तासगाव तालुक्यातील येळावी गावामधील जाधव मळा येथे नवदाम्पत्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. राज संजय जाधव (वय 23) आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव (वय 20) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तासगाव पोलिसात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मृत राज आणि ऋतुजा यांचा विवाह सुमारे 11 महिन्यांपूर्वी झाला होता. राज जाधव हे बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय आणि द्राक्षबाग शेती करत होते. राज यांचे बीएससीपर्यंतचे शिक्षण झाले असून ते नोकरीच्या शोधात होते. सध्या ते स्वतःची शेती करत होते तर त्यांच्या पत्नी गृहिणी म्हणूनच काम करत होत्या. राज, ऋतुजा आणि यांचे आई-वडील आणि लहान भाऊ असे एकत्रितपणे राहत होते.

जाधव कुटुंबियांनी बुधवारी (ता. 28) रात्री एकत्रित जेवण केले. त्यानंतर राज आणि ऋतुजा हे दाम्पत्य आपल्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले होते. पण, मध्यरात्री दीडच्या सुमारास राज यांच्या बेडरुममधून उलट्यांचा आवाज राज यांच्या वडिलांना ऐकू येऊ लागला. त्यामुळे वडिलांनी त्यांच्या बेडरुमकडे धाव घेतली. बेडरुमचा दरवाजा उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला असता त्यांना राज आणि ऋतुजा हे विषारी औषध प्राशन करुन बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. कुटुंबियांनी तातडीने दोघांनाही तासगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्याचा सल्ला दिला. मात्र, तिथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी ते दोघे मृत झाल्याचे सांगितले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. तासगाव पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तासगाव पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!