येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…
पुणे : येरवडा कारागृहात चार मोबाईल फोन आणि तीन सिमकार्ड आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृहातील माडी गेट आणि अंतर्गत भिंतीमध्ये हे मोबाईल आढळून आले आहेत. बेकायदेशीर मोबाईल आढळून आल्यानंतर कारागृहातील अधिकाऱ्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कारागृहाचे रक्षक गस्त घालत असताना मुद्रा न्यायालयाच्या परिसरातील उंच सीमा भिंती लगत एका कप्प्यामध्ये चार मोबाईलसह तीन सिम कार्ड आढळून आले आहेत. बॉलच्या साह्याने भिंतीच्या पलीकडून कारागृहात मोबाईल येत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कारागृहात सध्या अनेक कुख्यात गुन्हेगार असून, या गुन्हेगारांना बोलण्यासाठी बाहेरच्या मार्गाने थेट मोबाईल फोन बॉलच्या साह्याने कारागृहात फेकले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, येरवडा कारागृहात काही दिवसांपूर्वीच दोन गटामध्ये मोठा राडा झाला होता. यामध्ये काही जण जखमी झाले होते. या राड्यानंतर आता पुन्हा एकदा कारागृहात मोबाईल फोन आणि सीम कार्ड आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे.