कारवाई! पुणे शहरात युवतीवर कोयता हल्ल्यावेळी पोलिस कुठे होते?

पुणे: पुणे शहरातील सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याअंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबीत करण्यात आलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हल्ल्याच्या वेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरुगेट पोलिस चौकीत एकही पोलिस कर्मचारी उपस्थितीत नव्हता. तसेच बीट मार्शल यांनी देखील घटनास्थळी यायला 20 मिनिटे लावली. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे.

सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या कोयता हल्ल्यावेळी पोलिस कुठे होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. हल्ला झाल्यानंतर नागरिक आरोपीस पकडून घेऊन पेरूगेट पोलिस चौकीला गेले होते. पण, तिथे एकही पोलिस हजर नव्हता. जवळपास अर्धा तास उलटल्यानंतर पोलिस आल्यानंतर तीन जणांवर ही कारवाई केली जात आहे. पुणे शहरातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. पुणे पोलिस नक्की करतायत काय?, असा प्रश्न पुणेकर विचारत होते. अखेर आता याच प्रकरणी पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!