जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुंछमध्ये नदीचा प्रवाह ओलांडताना भारतीय लष्कराचे दोन जवान वाहून गेले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन जवान शनिवारी पुंछ परिसरात गस्त घालत होते. नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात आल्याने दोन जवान वाहून गेले आहेत. पुंछ जिल्ह्यातील मुगल रोडलगत पोशाना भागात बचाव आणि शोध मोहीम सुरू आहे. वाहून गेलेल्या दोन जवानांपैकी एकाचे नाव नायब सुभेदार कुलदीप सिंह असे आहे. अन्य जवानाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दल यांच्याकडून शोध आणि बचाव मोहिस सुरु आहे. कारवाईचे निरीक्षण करण्यासाठी आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ लष्कर आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
लष्कर, पोलीस आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे संयुक्त पथक दोन्ही बेपत्ता जवानांचा शोध घेत आहेत, पण अद्याप त्यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लष्कर आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्यावर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे लोकांना नदी आणि नाल्यांपासून दूर राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.