पोलिसांच्या श्वानाने कारजवळ इशारा केला अन् सर्वांनाच बसला धक्का…
नागपूर : नागपूरमधील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फारूखनगरमधील दोन लहान मुली आणि एक मुलगा खेळता खेळता अचानक शनिवारी (ता. १७) बेपत्ता झाले होते. त्या तिन्ही मुलांचा मृतदेह घराजवळच असलेल्या कारमध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारमध्ये खेळताना ते तिघेही आत अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
आलिया फिरोज खान (वय ६), आफरीन इर्शाद खान (वय ६), तौसिफ फिरोज खान (वय ४) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. फारुखनगरच्या मोहम्मदिया मस्जिदजवळ ते राहत होते. शनिवारी दुपारी खेळत असताना तिघेही बेपत्ता झाले होते. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला होता. पण, ते सापडले नव्हते. अखेर, पोलिसात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी याबाबत सोशल मीडियावरूनही आवाहन केले होते.
दरम्यान, पोलिसांनी रविवारी दुपारनंतर श्वानपथकाच्या मदतीने शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा श्वानाने एका नादुरुस्त असलेल्या कारजवळ इशारा केला. पोलिसांनी कार उघडून पाहिली असता तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कार एकाच जागी बऱ्याच दिवसांपासून उभी होती. खेळताना मुले आत गेल्यानंतर ती लॉक झाल्याची शक्यता आहे. तसेच उन्हाच्या कडाक्यामुळे कारचे तापमान वाढल्याने मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय आहे. या कारच्या काचांना काळे फिल्मिंग असल्याने बाहेरून कोणालाही आत मुले असल्याचे दिसले नसावे. पोलिस पुढील तपास करत आहेत.