रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!

पुणेः ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे.

पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत. प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा….

रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ या छोट्याशा गावात जन्म झालेल्या रमेश धुमाळ यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण आणि आठवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण हे गावातील शाळेत झाले. अभ्यासात हुशार असल्याने पहिली ते दहावीपर्यंत ते वर्गात नेहमीच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचे. दहावीत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्याने रमेश धुमाळ यांनी शिरूर येथील विद्याधाम प्रशाला येथे उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. दहावीनंतर कोणत्या वाटा निवडायच्या याबाबत त्यांना मार्गदर्शनही करायला कोणी नव्हते. मेडिकल करावं की, इंजिनिअरिंगला जावं अशा संभ्रमात असणाऱ्या रमेश यांनी शिक्षक व्हावे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण, पोलिस दलात दाखल होऊन पोलिस उपायुक्त झाले आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात…

श्री. रमेश धुमाळ यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत अकरावी सायन्सला शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत प्रवेश घेतला. हे शिक्षण घेत असताना टेल्को या नामांकित कंपनीत भरती निघाली. त्यासाठी त्यांनी परीक्षा दिली आणि त्यांना टेल्कोचे बोलावणे आले.

कमवा आणि शिका उतरवले प्रत्यक्षात…
टेल्को कंपनीत जॉईन झाल्यानंतर या ठिकाणी आयटीआयचे ट्रेनिंग दिले जायचे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स हा ट्रेड घेऊन श्री. धुमाळ सर्व कामे शिकत गेले. कंपनीत शिकत नोकरी करत असताना त्यांना पगारही चांगला मिळत होता. मात्र, उच्चशिक्षण अर्धवट राहिल्याची खंत त्यांच्या मनात होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या वाघिरे महाविद्यालयात त्यांनी १२ वी कॉमर्सला प्रवेश घेतला. त्याचवेळी गावातील शिक्षकांनी त्यांना कला शाखेत प्रवेश घेण्याबाबत मार्गदर्शन केले. मग त्यांनी कॉमर्स बदलून आर्टस् शाखेमधून प्रथम वर्षाकरिता मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला.

अभ्यास करताना नोकरीची कसरत…
पिंपरी-चिंचवडमधील कंपनीत काम सुरू होते. श्री. धुमाळ कष्टाळू आणि प्रामाणिक असल्याने कंपनी व्यवस्थापन त्यांना चांगले सहकार्य करायचे. दरम्यान, बहिस्थ शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी सुरू केली होती. धुमाळ सांगतात, ‘अभ्यास करत होतो. मात्र, मार्गदर्शन कोणाचेच नव्हते. २००५मध्ये पीएसआयच्या पूर्व परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. २००६मध्ये पीएसआयच्या मुख्य परीक्षेत केवळ १० मार्कांनी नापास झालो. अपयश पहिल्यांदाच आलं होतं. कंपनीतही पर्मनंट व्हायची काही चिन्हे दिसत नव्हती. मात्र, यावेळी आईने फोन करून खचून न जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी काही प्रमाणात निराशाही आली होती. दरम्यान, वडगाव शेरी येथील एका कंपनीत कामासाठी मुलाखत दिली. त्या कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी मिळाली.

नोकरीमध्ये शाबासकी…
२००७मध्ये राज्यसेवेच्या परीक्षेची जाहिरात आली. माझे काम चांगले असल्याने कंपनी मला सोडायला तयार नव्हती. मात्र, राज्यसेवेची परीक्षा द्यावी, असे मनाला वाटत होते. पण स्पर्धा परीक्षेसाठी मी राजीनामा देणार असल्याने कंपनी व्यवस्थापनाने मला रत्नागिरीच्या अॅटोमेशन प्रोजेक्टवर प्रोजेक्ट हेड म्हणून चांगल्या पदावर बढती देऊन पाठविले. या ठिकाणी काही दिवस काम केल्यानंतर राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासासाठी कोणालाही न सांगता एक दिवस मी कंपनीला कायमचा रामराम ठोकला. पुण्यात मित्राकडे आलो आणि त्याच्या रूमवरच राहून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. योगायोगाने २००८ मध्ये पीएसआय पदाची जाहिरात आली. ती परीक्षा दिली अन् त्याच दरम्यान राज्यसेवेचीही परीक्षा काही महिन्यांच्या अंतराने दिली.

पीएसआयपदाच्या मुख्य परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती. मुलाखतीपर्यंत मार्कांची चिंताच केली नव्हती. मात्र, सर्व परीक्षा पास होण्याचे ध्येय होते. या पदासाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याने पास होणार ही खात्री होतीच. परंतु, प्रथम तीन क्रमांकामध्येच येणार याचाही विश्वास वाटत होता. निकाल लागला त्यावेळी राज्यसेवेत महाराष्ट्र राज्यात प्रथम आलो होतो. यावेळी सगळेच निकाल पाहून आश्चर्यचकित झाले. शिरूर तालुक्यात मी प्रथमच एवढ्या मार्कांनी उत्तीर्ण झालो असल्याने गावाने मोठा मानसन्मान करत माझी भव्य मिरवणूक काढली होती.

यशाने नाही गेलो हुरळून…
या यशाने मात्र मी हुरळून गेलो नाही. पुढील ध्येय होते डीवायएसपी पदाचे. दरम्यान, डिसेंबर २००८मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल उशीरा लागला होता. त्यात नायब तहसीलदार म्हणून माझी निवड झाली. परंतु, त्या दरम्यान आणखी २००९ मध्येही राज्यसेवेच्या दिलेल्या परीक्षेचा निकाल २०१०मध्ये लागून डीवायएसपी पदावर निवड झाली होती. अनुभव म्हणून सातारा जिल्ह्यात दोन-अडीच महिने नायब तहसिलदार पदावर काम केलं. त्याच दरम्यान २०११मध्ये डीवायएसपी पदाचे ट्रेनिंग सुरू झाले. अकोला जिल्ह्यात बाळापूर येथे प्रोबेशनरी म्हणून नियुक्ती झाली. त्या ठिकाणी काम करत असताना दंगलीचा अनुभव घेतला. अनेक प्रश्न आणि समस्या जाणून घेत सोडविण्याचा प्रयत्न केला. याच वेळी गडचिरोली या अतिदुर्गम भागात नक्षलवादी भागात नेमणूक झाली. २०१४ ते २०१६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात अहेरी भागात काम केले. या ठिकाणी काम करत असताना शहरी नक्षलवाद्याची महत्त्वाची केस हाताळता आली. गडचिरोली ते नागपूर असा प्रवास करून न्यायालयीन प्रक्रियेचा अनुभव घेत या प्रकरणातील सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हा अनुभव अत्यंत विलक्षण होता.

गडचिरोलीतील कामाबद्दल सन्मान…
गडचिरोलीत केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत पोलिस महासंचालक पदक, तसेच खडतर सेवा पदक हे दोन सन्मान शासनाच्यावतीने देण्यात आले. त्याचबरोबर यावर्षी केंद्र सरकारच्यावतीने आंतरिक सुरक्षा पदकही देण्यात आले आहे. या ठिकाणी चांगल्या कामाचा ठसा उमटविल्यानंतर ठाणे शहरात बदली सहायक पोलिस आयुक्त (एसीपी कळवा) म्हणून काम सुरू केले. ठाणे शहरात सहायक पोलिस आयुक्त म्हणून काम पाहात असताना गुन्हेगारांवर जरब बसावी म्हणून मोक्का, तडीपारी, एमपीडीए आदी कारवाया करण्यात आल्या. अनेक ठिकाणी शांतता, सुव्यस्था राखणे गरजेचे असल्याने मोठ मोठ्या सभा, मोर्चे यांचा बंदोबस्त हाताळला. खून, दरोडे, दंगली, मारामारी, चोऱ्या या गुन्ह्यांवर आळा घालण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले. त्यानंतर जुलै २०१९ ते आतापर्यंत ठाणे शहरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाल्यानंतर पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहत आहे.”

सामाजिक जबाबदारीचे भान…
पोलिस खात्यात काम करत असताना श्री. धुमाळ यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखून अनेक उपक्रम सातत्याने राबविले आहेत. सांगली, कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी सांगलीतील इस्लामपूर येथे जाऊन मदतकार्य केले. समाजासाठी काम करत असताना आपण गावाचेही देणे लागतो या हेतूने गावातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, तसेच विविध उपक्रम धुमाळ सातत्याने राबवत आहेत. गावचा संपूर्ण इतिहास माहित व्हावा, या हेतूने पिंपळपान नावाचा दिवाळी अंक प्रकाशित केला.
दरम्यान, पोलिस खात्यात उच्च पदावर कार्यरत असलेल्या पोलिस उपायुक्त धुमाळ यांनी संघर्ष अन जिद्दीने ध्येय गाठले असले तरी त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले आहेत. पोलिस खात्यात जाऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुणांना ते खऱ्या अर्थाने आज प्रेरणादायी ठरत आहेत.

‘पोलिसकाका विशेषांक’
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!