पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!

पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे.

पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत. प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा….

पौर्णिमा तावरे यांचा शेतकरी कुटुंबातला जन्म. घरचे एकत्रित कुटुंब. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झाले. शाळेमध्ये असताना कबड्डी आणि बुद्धीबळ खेळाची आवड होती. सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच बालपण आणि शिक्षण सुरू होते. २००४ मध्ये दहावीची परीक्षा दिली आणि ७० टक्के गुण मिळाले. दहावीनंतर ११ वी १२ चे शिक्षण बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालयात तर कृषी महाविद्यालयातून २०१० मध्ये बी.एस्सी अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले.

माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान…

बारामती येथे शिक्षण सुरू असताना विविध अधिकाऱ्यांचे व्याख्यान आयोजित केले जायचे. अनेकांच्या व्याख्यानामधून प्रेरणा मिळत असे. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान ऐकले आणि एक उर्जा मिळाली. व्याख्यान ऐकल्यानंतर क्लास वन अधिकारी होण्याचे ठरवले. मनाचे परिवर्तन झाले. वाचनाची आवड तर पहिल्यापासूनच होती. पण, व्याख्यान ऐकल्यानंतर पुढे काय करायचे आणि त्यासाठी काय करायला हवे, यासाठी योग्य दिशा मिळाली.

एमपीएससीचा अभ्यास…
पुढे काय व्हायचे आहे, हे तर ठरवले होते. मग त्यादृष्टीने अभ्यास करून पुढे जायचा निश्चय केला. बीएस्सी अॅग्रीचे २०१० मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल २०१२ मध्ये लागला आणि उत्तीर्ण झाल्या. कुटुंबासह त्यांनाही मोठा आनंद झाला. पहिला टप्पा पार केला होता. मुंबई येथे मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून रुजू झाल्या. पण, यावरच त्यांना थांबायचे नव्हते. ग्रामीण भागातून प्रथमच मुंबईत गेल्या होत्या. नोकरी करत असतानाच दुसरीकडे अभ्यासही सुरू होता. अभ्यासासाठी मैत्रीणींचीही मोठी मदत होत होती. मंत्रालयात २०१२ ते २०१५ पर्यंत नोकरी केली.

क्लासवन अधिकारी होण्याचे स्वप्न…
मुंबईसारख्या शहरात ती पण मंत्रालयात नोकरी मिळाली होती. पण, यावरच थांबायचे नव्हते तर क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करायचे होते. त्या दृष्टीकोनातून त्यांची वाटचाल सुरू होती. नोकरी करत असताना अभ्यासासाठी वेळ कमी मिळत होता. पण, एकत्रित अभ्यास केल्यामुळे मदत होत होती. २०१४मध्ये परत DYSPची परीक्षा दिली आणि पासही झाल्या. क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाल्यामुळे मोठा आनंद झाला होता. DYSPची परीक्षा पास झाल्यानंतर

मंत्रालयामधील नोकरीचा राजीनामा दिला…
DYSPची परीक्षा पास झाल्यानंतर २०१५ मध्ये नाशिक येथे प्रशिक्षण झाले. यानंतर धुळे, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे प्रोबेशनवर काम केले. पुढे २०१८ ते २०२० मध्ये नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे DYSP म्हणून तर २०२० ते आजपर्यंत त्या पुणे शहरामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

मोबाईलपासून दूर…
एखादे स्वप्न साकार करायचे असेल तर त्यासाठी जिद्द आणि मेहनत महत्त्वाची असते. क्लास वन अधिकारी होण्याचे ठरवल्यानंतर त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली होती. मोबाईलपासून त्या दूर होत्या. अभ्यास आणि खेळावर लक्ष केंद्रीत केले होते. एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आणि मुंबईत नोकरी मिळाल्यानंतर प्रथम मोबाईल हातात घेतला होता. तो पण अगदी साधा मोबाईल. केवळ कुटुंबियांशी संपर्क साधण्यासाठी. यश प्राप्त केल्यानंतर पुढील सर्व मार्ग सुरळीत होतात. पण, तोपर्यंत मेहनत घेणे खूप महत्त्वाचे असते, असा सल्ला पौर्णिमा तावरे देतात.

MPSC म्हणजे…
MPSC परीक्षा म्हणजे एक प्रकारे इच्छाशक्ती, एकाग्रता याची परीक्षा आहे. परीक्षा देत असताना पाच टक्के नशिबाचाही भाग आहे. दोन वर्षे प्रचंड अभ्यास करून परीक्षेला बसा. पण, दोन वर्षात यश मिळाले नाही तर खचून जाऊ नका. अर्थार्जनासाठी दुसरा पर्याय स्वीकारा अथवा मार्ग निवडा. दुसरीकडे काम करत असताना अभ्यास करून परत परीक्षा द्या. यामध्ये काही जणांना लवकर यश मिळते तर काही जणांना उशीरा. तर काही जणांना सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागते. यामुळे अनेकांना नैराष्यही येते. यामुळे केवळ स्पर्धा परीक्षांवर अवलंबून राहू नका. हातामध्ये दुसरा पर्याय ठेवा. दोन वर्षात यश नाही मिळाले तर दुसरा मार्ग निवडा, असाही सल्ला पौर्णिमा तावरे देतात.

महिलांनो आत्महत्या हा पर्याय नाही…
पौर्णिमा तावरे या सात वर्षांपासून पोलिस दलात काम करत आहेत. विविध अनुभव आले आहेत. पण, या काळामध्ये अनेक महिलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे त्यांच्यासमोर उभी आहेत. विविध कारणांमधून महिला लहान वयातच आत्महत्येचा पर्याय निवडतात. आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या लहान मुलांकडे पाहून वाईट वाटते. पुढे मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय, त्यांना आई मिळत नाही. छोट्या-छोट्या कारणांवरून आत्महत्येचा पर्याय निवडू नका. काही अडचण असेल तर जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मदत घ्या. पोलिस मदतीसाठी सदैव तत्पर आहे.

पोलिस दल…
पोलिस दलात आल्याचा आणि वर्दीचा खरोखरच मोठा अभिमान आहे. पोलिस दलात काम करत असताना अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करता येते. पोलिस दल हा तर मुलींसाठी खूप चांगला पर्याय आहे. पोलिस दलात नोकरी करत असताना अनेकांचे प्रश्न समोर येत असतात. प्रश्न सोडवत असताना दिवसाचा वेळ कधी जातो हे समजतही नाही. सतत नागरिकांमध्ये राहता येते. थोडक्यात, पोलिस दल हे काम करण्यासाठी खूप चांगले क्षेत्र आहे.

एकत्र कुटुंब…
क्लास वन अधिकारी होण्याचे २०१५ मध्ये स्वप्न साकार झाल्यानंतर विवाह झाला. पती विक्रम वसंत बांदल हे जळगाव येथे प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. माहेरी व सासरी आजही एकत्रित कुटुंब आहे. यामुळे पहिल्यापासून मोठ्या कुटुंबात राहण्याचे भाग्य लाभले. दोन मुलांची आई असून, एकत्रित कुटुंब असल्याचा मोठा फायदा असतो. कुटुंबातील सदस्य नोकरीमुळे बाहेर असले तर वर्षातून दोन-तीन वेळा एकत्र येतात. त्यामुळे खूप छान वाटते. आई-वडिलांमुळे घडले आणि पुढे सासरच्यांचा मोठा आधार मिळाला. नोकरी व कुटुंब सांभाळणे ही तारेवरची कसरत आहे, असेही पौर्णिमा तावरे-बांदल सांगतात.

सल्ला…
ताणतणावादरम्यान शांत राहा.
कोणतीही वेळ निभावणे गरजेचे असते.
यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका.
खेळाचा आधार घ्या.
कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घेऊ नका.
त्यावर सकारात्मक पर्याय शोधा व पुढे चाला.

‘पोलिसकाका विशेषांक’
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!