दिशा भोईटे मृत्यू आणि शवविच्छेदन अहवालाबाबत सविस्तर माहिती…

पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर शवविच्छेदन अहवालाबाबत एक पोस्ट लिहिली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे…

दिशा भोईटे मृत्यू आणि शवविच्छेदन अहवालाबाबत…
माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट २०२३ म्हणजेच राखी पोर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी निधन झाले. निधनाला चार महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संशयास्पद मृत्यूमुळे व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. अहवाल कधी येईल? यासंबंधी ससूनमध्ये जाऊन माहिती घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण, माहिती मिळत नव्हती. पत्रकार असूनही माहिती मिळत नव्हती. सर्वसामान्य नागरिकांचे तर विचारायलाच नको. माहिती घेतल्याशिवाय जायचे नाही ठरवले. आक्रमक पवित्रा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण, वरिष्ठांकडे गेलो आणि सविस्तर माहिती मिळाली. संबंधित माहिती अनेकांना भविष्यात उपयोगी ठरू शकते.

भाची दिशा भोईटे हिच्या बाबत प्रथम घटनाक्रम….

घटनाक्रम…
दिशा हिला २४ ऑगस्ट २०२३ रोजी ताप आला.

१) आनंद हॉस्पिटल, पारनेर (ता. पारनेर, जि. अहमदनगर):
२५ ते २८ ऑगस्ट दरम्यान पारनेर येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल.
२८ ऑगस्ट रोजी आनंद हॉस्पिटल, पारनेर (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथून डिस्चार्ज.
२८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दिशाला प्रचंड त्रास होऊ लागला.

२) ओंकार रुग्णालय (सुपा) (जि. अहमदनगर):
२९ ऑगस्ट रोजी सकाळी ओंकार रुग्णालय (सुपा) येथील रुग्णालयात दाखल.
– ओंकार रुग्णालयाने रक्त तपासणी केली
– रक्ताचा अहवाल हाती आल्यानंतर डेंगू झाल्याचे निदान.
– ओंकार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पुण्याला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
– दिशा हिची प्रकृती ढासळत चालली होती.
– ओंकार रुग्णालयातील डॉक्टरांची अरेरावीची भाषा
– रुग्णालयाकडे रुग्णवाहिकची व्यवस्था नव्हती.
– नातेवाईकांना तुमची रुग्णवाहिका नको म्हणून सांगण्यात आले
– हॉस्पिटलची रुग्णवाहिका फोन केल्यानंतर तब्बल दीड तासानंतर आली.
– एरवी अर्धा तासात रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचते.
– रुग्णवाहिकेत रुग्णासोबत एक डॉक्टर आणि नातेवाईक
– रुग्णवाहिका पुणे शहराच्या दिशेने निघाली.
– दिशा शिरूर जवळ असताना पोट दुखत असल्याचे सांगू लागली.
– रुग्णवाहिकेमधील डॉक्टरने एक इंजेक्शन दिले.
– डॉक्टरने इंजेक्शन दिल्यानंतर दिशा दहा मिनिटानंतर बोलायची बंद झाली ती कायमचीच.
– रुग्णवाहिका केईएम रुग्णालयात संध्याकाळी सहाच्या सुमारास दाखल झाली.
– केईएमच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिशाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
– दिशाचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी.
– २९ ऑगस्ट रोजी रात्री शवविच्छेदन करण्यात आले.
– मृत्यूबाबत संशय व्यक्त करत व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
– ३० ऑगस्ट रोजी दिशावर अंत्यसंस्कार.

शवविच्छेदन म्हणजे काय?
शरीराचे शवविच्छेदन म्हणजे एखादया व्यक्तीचा मुत्यु झाला असेल तर त्याचे कारण काय असावे हे शोधण्याकरिता शवविच्छेदन केले जाते. हे कायदयाने बंधनकारक आहे. शरीराला काही विशिष्ट ठिकाणी छेद देऊन डोके, छाती, प्लिहा, किडनी,लिव्हर आदी अवयवांवर झालेला परिणाम तपासला जातो. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला स्पष्ट होते. कोणताही अनैसर्गिक, संशयित मृत्यू, आत्महत्या किंवा पोलिसांनी शिफारस केली तर मृतदेहाचे शवविच्छेदन करावे लागते.

शवविच्छेदनाचे दोन प्रकार
१) नैसर्गिक मृत्यू
२) संशयास्पद मृत्यू

शवविच्छेदन अहवाल किती दिवसात मिळतो?
नैसर्गिक मृत्यू : साधारण एक ते आठ दिवसात मिळतो.
संशसास्पद मृत्यू : शवविच्छेदन करताना संशयास्पद मृत्यू वाटत असल्यास व्हिसेरा राखून ठेवला जातो आणि तो अहवाल दोन ते सहा महिन्यात मिळतो.

शवविच्छेदन अहवाल कोणाला मिळतो?
शवविच्छेदन अहवाल हा संबंधित पोलिस स्टेशनकडे दिला जातो. पण, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा घ्यावा लागतो. शवविच्छेदनाचा अहवाल तयार झाल्यानंतर मृत्यूचे कारण त्या अहवालावर नमूद केले जाते आणि डॉक्टरांच्या सहीने तो पुढे दिला जातो.

ससून रुग्णालयाच्या अंतर्गत…
ससून रुग्णाल्याच्या अंतर्गत पुणे, सातारा आणि अहमदनगर हे तीन जिल्हे येतात. यामुळे रुग्णांची संख्या मोठी आहे. यामुळे अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

शवविच्छेदनाचा इतिहास काय?
पोस्टमॉर्टेमला ऑटोप्सी असेही म्हटले जाते. इस. पूर्व ३५०० मध्ये सर्वात प्रथम इराकमध्ये एका प्राण्याच्या शरीराचं शवविच्छेदन करण्यात आले. देवाचा संदेश काय आहे ते समजून घ्यायचं म्हणून प्राण्याच्या विविध अवयवांची तपासणी करणं आवश्यक आहे असं तेव्हा समजलं गेलं. यानंतर १४ व्या शतकात इटलीच्या विद्यापीठात डिसेक्शन शिकवण्यास सुरूवात झाली.

भारतात शवविच्छेदन कधी सुरू झालं?
मृत्यूचं कारण नेमकं काय? हे जाणून घ्यायचं असेल तर शवविच्छेदन करायला हवं हे चाणक्याने ओळखले होते. याच परंपरेत महर्षी सुश्रुत यांचेही नाव घेतले जाते. त्यांना भारतात शस्त्रक्रियेचे जनक असेही संबोधलं जाते. सुश्रुत संहितेत शस्त्रक्रियेशी संबंधित त्या गोष्टी लिहिल्या आहेत ज्या आजही डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. इतिहासातल्या या महितीच्या आधारेच आपण शवविच्छेदन या विषयात खूप प्रगती केली आहे.

काय असतं शवविच्छेदन? किती प्रकार असतात?
शवविच्छेदनचा अर्थ सरळ शब्दात सांगायचा झाला तर फॉरेन्सिक एक्सपर्ट शवविच्छेदन करून मृत्यूचं नेमकं कारण शोधू शकतात. मृतदेहाची ओळख पटवायची असेल, मृत्यूची अचूक वेळ सांगायची असेल तरीही शवविच्छेदन केलं जाते. अनेकदा मृतदेहाचे विघटन झालेले असते. अशा परिस्थितीतही मृत्यू किती वाजता झाला ते सांगितले जाऊ शकते. शवविच्छेदनाचे दोन प्रकार असतात. मेडिको लीगल पोस्टमॉर्टेम हे पोलिसांनी किंवा मॅजिस्ट्रेटनी सांगितल्यावर केले जाते. तर दुसरा प्रकार आहे क्लिनिक पोस्टमॉर्टेम. अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे शवविच्छेदन केले जाते. मात्र या प्रकारच्या शवविच्छेदनात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची संमती आवश्यक असते.

शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया काय असते?
डॉक्टर सांगतात की, मेडिको लीगल शवविच्छेदन करायचं असतं तेव्हा त्यासंबंधीचे सगळी कागदपत्रं ही पोलिस घेऊन येतात. पोलिस हे सांगतात की संबंधित मृतदेहाचं शवविच्छेदन करायचं आहे. फक्त गुन्हा घडला आहे म्हणूनच शवविच्छेदन केलं जात नाही. तर अपघाती मृत्यू, संशयास्पद मृत्यू, आत्महत्या अशा प्रकरणांमध्येही शवविच्छेदन केले जाते. पोलिस जो तपास करत असतात त्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो शवविच्छेदन अहवाल. पोस्टमॉर्टेम करणे जेवढं महत्त्वाचे असते तेवढीच महत्त्वाची असते वेळ.

शवविच्छेदनाचा अहवाल देण्याची मुदत काय असते?
शवविच्छेदनाचा अहवाल देण्याचे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळे नियम आहेत. पंजाब आणि हरयाणा न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत की २४ तासांच्या आत शवविच्छेदन अहवाल सोपवला गेला पाहिजे. असं जेव्हा करायचं असतं तेव्हा पोलिसांना तुम्ही शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत थांबवून ठेवलं तरीही चालणारं असतं. जेव्हा पोलिस किंवा कोर्टाकडून शवविच्छेदन करायचं आहे हे सांगितले जाते तेव्हा आम्हाला मृत व्यक्तीच्या नातेवाईकाची संमती लागत नाही.

दरम्यान, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर संबंधित कुटुंब दुःखात बुडते. कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला असतो. संबंधित कुटुंबाला मृत्यूचे कारण समजत नाही. दुसरीकडे सरकारी काम. कोणी माहिती देत नाही. सर्वसामान्य नागरिकांना कोणाकडे जावे कळत नाही. यामुळे दिवस पुढे-पुढे जात राहतात. मग, आपली व्यक्ती गेली. आता मृत्यूचे कारण समजून काय होणार? हा विचार पुढे येऊ लागतो. पोलिस अथवा प्रशासनाकडे पाठपुरावा केला नाही तर मग विचारायलाच नको. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीला मृत्यूनंतरही न्याय मिळेल की नाही, हे कोणीच सांगू शकत नाही. यामुळे संबंधित कुटुंबियांनी सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अथवा, रोज मरे त्याला कोण रडे, अशी अवस्था प्रशासनाची झाली आहे.

दिशा भोईटे हिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर मी लिहित आहे. पण, गेल्या चार महिन्यानंतरही माहिती समजत नसल्यामुळे अनेकजण मला विचारणा करत होते. यामुळे ससूनमध्ये जाऊन सविस्तर माहिती घेतली. दिशा भोईटे हिच्या मृत्यूचा अहवाल हाती आल्यानंतर खरं कारण समजू शकेल.

– संतोष धायबर, पत्रकार
santosh.dhaybar@gmail.com
27/12/2003

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!