हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका युवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे…

चूक कोणाची? आई मला जगायचं गं…
माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे मंगळवारी (ता. २९) म्हणजेच राखी पोर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी निधन झाले. तिच्या निधनाने कुटुंबियांसह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केवळ ताप आला आणि निधन झाले. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण, तिच्या बाबतीत घडले आहे. असो, ईश्वरी सत्तेपुढे कोणाचे चालत नाही किंवा तिचे आयुष्यच तेवढे होते असेच म्हणून आयुष्यभर दुःखाचा डोंगर घेऊन माझी बहिण छाया हिला जगावे लागणार आहे…

दिशा भोईटे…
दिशा हिला जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून ते तिने जगाचा निरोप घेतला तोपर्यंत पाहात आलो होतो. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील घाणेगाव हे तिचे गाव. बीएसीएस झाली होती आणि एमसीएसला प्रवेश घेतला होता. अभ्यासात हुषार. कमी बोलणारी. वडिलांची अतिषय लाडकी. आई-भावावर प्रेम करणारी आणि आम्हा भावांची एकुलती एक लाडकी भाची.

किरकोळ आजारी पडली…
दिशा कधी आजारी पडली असे आठवत नाही. गेल्या काही दिवसांपासून तिला ताप येऊ लागला होता. दिशाच्या आई-वडिलांनी तिला पारनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. ताप येत जात होता. डॉक्टर उपचार करत होते. पारनेर पासून गाव जवळ असल्यामुळे दिवसभर उपचार केल्यानंतर संध्याकाळी घरी परतायचे. चार-पाच दिवस हे सुरू होते. पण, तिचा ताप काही कमी होत नव्हता. तात्पुरते बरे वाटत होते. पण, प्रगती अशी नव्हती. मंगळवारी (ता. ३०) सकाळी तिला जास्तच त्रास होऊ लागला. डॉक्टर बदलायचे ठरले. दिशाला सुपे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते. पण, तिची प्रकृती ढासळू लागली होती. मंगळवारी केलेल्या तपासणीचा अहवाल हाती आल्यानंतर तिला डेंग्यू झाल्याचे समजले. डॉक्टरांनी तिला पुण्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

आई मला जगायचं ग…
दिशाला आम्ही सर्वजण दिदी बोलायचो. रुग्णवाहिकेत बसेपर्यंत दिदी छान बोलत होती. पण, अशक्तपणा जाणवत होता. आई मला जगायचं गं, असे म्हणाली. पण, प्रकृती एवढी गंभीर होईल आणि दिदी जगाचा निरोप घेईल, असे वाटलेच नव्हते. दिदीचा भाऊ आकाश, बहिण छाया तिला आधार देत होते. रुग्णवाहिका पुण्याच्या दिशेने निघाली होती.

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी…
रुग्णवाहिका सुपे येथून पुण्याकडे निघाली होती. सायरन वाजत होता. शिक्रापूर पर्यंत वेगात आली. शिक्रापूर पासून रुग्णवाहिकेचा वेग कमी-कमी होऊ लागला. तशी दिशाची प्रकृती गंभीर होऊ लागली. रुग्णवाहिकेत भाऊ शरद, भाचा आकाश आणि आकाशचा मित्र मनोहर आणि डॉक्टर असे चौघे. रुग्णवाहिकेत डॉक्टर उपचार करत होते. पण, दिशाची प्रकृती बिघडत चालली होती. वाघोलीपासून तर पुढे प्रंचड वाहतूक कोंडी. सायरन जोरजोरात वाजुनही रस्ता मिळत नव्हता. हतबलता आली होती. अखेर, आकाश आणि त्याचा मित्र मनोहर रुग्णवाहिकेतून खाली उतरत होते. रस्ता मोकळा करण्यासाठी जोरजोरात ओरडत होते. कोणी बाजूला होत होते तर कोणी बाजूला व्हा म्हटल्यावर चिडत होते. पण, एका भावाची बहिणीसाठी धडपड जोरात सुरू होती.

एक देवमाणूस…
रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नव्हता. आकाश आणि मित्र जोरजोरात ओरडत होते. संबंधित दृष्य पाहून एक दुचाकीचालक देवप्रमाणे धाऊन आला तो येरवडा पासून. येरवड्यातील वाहतूक कोंडी आणि आकाशकडे पाहून दुचाकी चालकाने त्यांच्या दुचाकीवर आकाशला बसवले. दुचाकीचालक आणि आकाश रुग्णवाहिकेपुढे आणि रुग्णवाहिका पाठीमागे. दोघे जोरजोरात ओरडून रस्ता मोकळा करून देत होते. येरवडा ते केईएम हॉस्पिटलपर्यंत देवदूताने मोठी मदत केली. केईएम हॉस्पिटलमध्ये पोहचल्यानंतर देवमाणूस निघून गेला. या गडबडीमध्ये त्यांचे नाव विचारायचे राहून गेले.

पण, वेळ निघून गेली होती…
रुग्णवाहिका केईएम हॉस्पिटलपर्यंत पोहचली होती. पण, वेळ निघून गेली होती. काही वेळापूर्वीच दिशाने जगाचा निरोप घेतला होता. केईएमच्या डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. खूप-खूप प्रयत्न केले. पण, यश आले नाही.

व्हिसेरा ठेवला राखून…
हसतमुख असणारी दिदी निपचीत चेहऱ्याने कायमची बेडवर झोपली होती. डेंग्यूमुळे एका युवतीचा मृत्यू होणे, हे डॉक्टरांचे मोठे अपयश आहे. २०२३ मध्ये प्रथमच अशी केस पाहात आहोत, अशी प्रतिक्रिया केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिदीचा मृत्यू संशयास्पद वाटल्यामुळे व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. अहवाल हाती आल्यानंतर कारवाई होईलच. पण, केवळ ताप आला म्हणून दिदीला जगाचा निरोप घ्यावा लागला, यावर कोणाचाच विश्वास बसत नाही.

मृत्यू अटळ आहे. ईश्वरी सत्तेपुढे कोणाचे चालत नाही. आयुष्यच तेवढे असते. हे सर्व मान्य आहे. जर-तर वर बोलण्यात काही अर्थ नाही. पण, डॉक्टरांनी वेळीच पुण्याला नेण्याचा सल्ला दिला असता तर… पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी नसती तर… असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिस नक्कीच कारवाई करतील. पण, असंख्य स्वप्न पाहणाऱ्या आमच्या दिदीला जगातून जावे लागले. आई-वडिल आणि भावाला आयुष्यभर दुःखाचा डोंगर घेऊन जगावे लागणार आहे. खूप वाईट घडली आहे, अशी कोणाच्याही बाबतीत घडू नये, एवढेच वाटते…. खूप लिहीण्यासारखे आहे. पण, भाचीवर हे लिहीण्याची वेळ येईल, असे कधीच वाटले नव्हते…

भावपूर्ण श्रद्धांजली दिशा…

– संतोष धायबर
santosh.dhaybar@gmail.com
31/08/2023

हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…

हृदयद्रावक! लातूरच्या अविष्कारने परीक्षा दिली अन् घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली अन् लेकराचा बळी…

हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!