पाकिस्तानातील कोहाटमध्ये शुक्रवारच्या नमाजादरम्यान मशिदीजवळ झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी…

इस्लामाबादः शुक्रवारी खैबर पख्तुनख्वामधील कोहाट जिल्ह्यातील पोलीस लाइन्स परिसरातील मशिदीजवळ झालेल्या स्फोटात, किमान १५ जण ठार झाले. या दुर्घटनेत ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हा मुख्यालय रुग्णालयाचे एमएस ताहीर अली शाह म्हणाले, की स्फोटानंतर १५ मृतदेह आणि ५० हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा स्फोट शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती, की मशिदीबाहेर स्फोट झाल्या त्या ठिकाणी एक मोठा खड्डा पडला आहे. जखमींमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे मशिदीच्या बाह्य भागाचे बरेच नुकसान झाले असून, एक भिंत कोसळली आहे.

प्राथमिक अहवालानुसार, स्फोटकांनी भरलेले एक वाहन ओल्ड पोलीस लाइन्समध्ये घुसवण्यात आले. मात्र, स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. स्फोटानंतर सशस्त्र अतिरेक्यांशी चकमक झाली, असे रेस्क्यू ११२२ चे प्रवक्ते बिलाल अहमद फैजी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

आयजी हमीद म्हणाले, खैबर पख्तुनख्वा पोलीस दहशतवादाविरोधात एका भक्कम भिंतीप्रमाणे उभी आहे. अशा प्रकारचे भ्याड हल्ले आमचे मनोधैर्य खचवू शकत नाहीत. निवेदनात त्यांच्या हवाल्याने म्हटले आहे, की मृतांचे रक्त व्यर्थ जाणार नाही. दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना कठोर शिक्षा भोगावी लागेल. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!