
व्यापारी जहाजावरील हल्ल्यात ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय खलाशाचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध
नवी दिल्ली: ओमानच्या लिमाहजवळ ‘एमएसव्ही अल जुसुफी’ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, परराष्ट्र मंत्रालयाने निषेध व्यक्त केला आहे. तणाव कमी करण्याबाबत यापूर्वी केलेल्या आवाहनाचा परराष्ट्र मंत्रालयाने पुनरुच्चार केला. प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, की हल्ला झालेल्या जहाजावर १४ भारतीय खलाशी होते.
भारतीय खलाशांपैकी १३ जणांची सुटका करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, की ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून, सुटका झालेल्या भारतीय नागरिकांच्या लवकरात लवकर मायदेशी परतण्यासाठी ओमानच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात आला आहे.
या प्रदेशात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांबद्दल, परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आणि तणाव कमी करून राजनैतिक तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी पूर्ण करण्याचे आवाहन केले.
व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या सततच्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. या प्रदेशात व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, या प्रदेशातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधून मुक्त आणि अनिर्बंध नौकानयन आणि व्यापार लवकरात लवकर पूर्ववत करण्याची गरज असल्याचे, परराष्ट्र मंत्रालयाने या निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी, ११ ऑक्टोबर रोजी ओमानमधील सोहार अँकरेज येथे ११ भारतीय खलाशी असलेल्या ‘एमटी पेट्रो डॉल्फिन’ या टँकरवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर, दोन भारतीय खलाशी बेपत्ता झाल्याचे वृत्त होते, अशी माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली. ते म्हणाले, की नऊ भारतीयांची सुटका करण्यात आली होती.
स्थानिक तटरक्षक दलातर्फे शोध आणि बचाव कार्य सक्रियपणे सुरू आहे. बचाव कार्याला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या बेपत्ता जवानांना सुरक्षितपणे शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत आहोत, असे ते पुढे म्हणाले.
यापूर्वी ६ ऑक्टोबर रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या ‘एमटी ऑन पीस’ या जहाजावर ओमानच्या किनाऱ्याजवळ क्षेपणास्त्राने हल्ला झाला होता. या प्रदेशातील शांतता आणि स्थैर्याच्या हितासाठी अशा घटना तत्काळ थांबवण्याचे आवाहन भारताने पुन्हा केलेआहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, जहाजावरील एकूण कर्मचाऱ्यांमध्ये १७ भारतीय नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्यात ११ भारतीय नागरिकांसह १२ कर्मचारी जखमी झाले.

