
डोक्यात शिरलेल्या बंदुकीच्या गोळीसह सहाय्यक पोलिस निरीक्षक दुचाकीवरून पोचले पोलिस ठाण्यात…
अमृतसरः अजनाला पोलीस ठाण्यात तैनात असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक जसवंत सिंग यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळी त्यांच्या डोक्यात शिरून ते जखमी झाले आणि रक्तस्त्राव होऊ लागला. असे असूनही, न डगमगता ते आपल्या दुचाकीवरून अजनाला पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी अमृतसरमधील लिवासा रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, जसवंत सिंग शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजता आपल्या दुचाकीवरून अमृतसर शहरातून अजनालाकडे जात होते. जेव्हा ते राजासांसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भल्ला पिंड परिसरात पोचले, तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी त्यांच्या डोक्यात लागून ते जखमी झाले आहेत.

