जुन्नर तालुक्यात घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरांची कुलपे तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि ओतूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत ओतूर पोलीस ठाण्यातील तीन आणि नारायणगाव पोलीस ठाण्यातील एक, असे एकूण चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून १९ तोळे सोन्याचे दागिने, २ किलो ७७० ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन संशयित घरफोडी करणाऱ्यांसह चोरीची चांदी खरेदी करणाऱ्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

१५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींचा माग…
ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याच पद्धतीने ओतूर आणि नारायणगाव परिसरातही घरफोडीच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आव्हान होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना एक संशयित कार दिसून आली. या कारचा माग काढण्यासाठी पथकाने ओतूरपासून नाशिकपर्यंत सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

नाशिकमधून तिघांना ताब्यात
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी कार नाशिकमधील वडाळा परिसरात राहणारा सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्यासोबत वसीम पठाण आणि अदनान पठाण हे दोघेही असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत नाशिक जिल्ह्यातील वडाळा, इंदिरानगर आणि लासलगाव परिसरातून तिघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१. वसीम मुनीर पठाण (वय २९), रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक.
२. अदनान युनूस पठाण (वय २६), सध्या रा. वडाळा, इंदिरानगर, नाशिक; मूळ रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक.
३. सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख (वय ४०), रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी संबंधित घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोने, चांदी, दोन लाखांची रोकड आणि कार जप्त
या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेले १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, २ किलो ७७० ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. घरफोडी करून चोरलेली चांदी खरेदी केल्याच्या आरोपावरून सागर अशोक शिंदे (वय ३०, रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच गुन्हा करताना पकडले जाण्यापासून बचाव करण्यासाठी आरोपींनी वापरलेले वायरलेस वॉकी-टॉकीही जप्त करण्यात आले आहेत.

ओतूरमधील तीन, नारायणगावमधील एक गुन्हा उघड
पोलिसांच्या माहितीनुसार, या कारवाईत पुढील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
– ओतूर पोलीस ठाणे: गुन्हा रजिस्टर क्रमांक २६५/२०२६.
– ओतूर पोलीस ठाणे: गुन्हा रजिस्टर क्रमांक २१८/२०२६.
– ओतूर पोलीस ठाणे: गुन्हा रजिस्टर क्रमांक १३७/२०२६.
– नारायणगाव पोलीस ठाणे: गुन्हा रजिस्टर क्रमांक २०३/२०२६.
या गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
संबंधित कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, सहायक फौजदार दीपक साबळे, पोलीस अंमलदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, भारत मोहोळ, चेतन पाटील तसेच ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नरेंद्र गोराणे, बाळशिराम भवारी, विशाल गोडसे आणि धनंजय पालवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

पुढील तपास सुरु…
अटक करण्यात आलेले आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, या टोळीने आणखी कुठे घरफोड्या केल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे. पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे नाशिकपर्यंत माग काढत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जुन्नर तालुक्यातील चार घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, मोठ्या प्रमाणातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे बदल, 30 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा नावे…

विषारी दारू! पुणे ग्रामीण पोलिस दलातील चार जणांचे तत्काळ निलंबन…

पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दरोडेखोरांचे आव्हान स्विकारले अन्…

Video: पुणे ग्रामीण पोलिसांनी स्मशानभुमी मधील लाकडावरुन उघड केला खुनाचा गुन्हा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!