वैजापूरमधील मिठाईच्या दुकानातून आणलेल्या कचोऱ्यांमध्ये उंदरांच्या लेंड्या…

छत्रपती संभाजीनगरः जिल्ह्यातील वैजापूर शहरातील एका मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेल्या कचोरीमध्ये, डझनभर उंदराच्या लेंड्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खाद्यपदार्थांमध्ये अशाप्रकारची अतिशय घाणेरडी भेसळ आणि निष्काळजीपणा पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

एका ग्राहकाने कचोरी सेंटरमधून पाच कचोऱ्या खरेदी केल्या होत्या. मात्र, घरी जाऊन कचोरी उघडल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. खरेदी केलेल्या सर्वच्या सर्व म्हणजेच पाचही कचोऱ्यांमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. धक्कादायक म्हणजे मुलांनी दोन कचोरी आधीच खाल्ल्याचा आरोप या ग्राहकाने केला आहे. मी मुलांसाठी या दुकानातून कचोरी घेऊन गेलो होतो. त्यामध्ये उंदरांच्या लेंड्या आढळल्या आहेत. फक्त एका कचोरीत नव्हे तर चार-पाच कचोरीत लेंड्या सापडल्या. मी या कचोऱ्या दुकानात आणून दाखवल्यावर त्यांनी ते पार्सल फेकून दिले आहे. माझ्याकडे यांना ऑनलाईन केलेल्या पेमेंटची पावतीही आहे. आता ते म्हणतात की, आमच्याकडून चूक झाली. पण आम्ही याची तक्रार करणार, आहोत. या घटनेनंतर आता अन्न व औषध प्रशासनाकूडन या मिठाईच्या दुकानावर कोणती कारवाई केली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून या विभागाच्या कारभारात ‘न भूतो न भविष्यती’ अशी सुधारणा आणि तत्परता पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अन्न व औषध प्रशासन खात्याची पथकं दररोज राज्याच्या कोणत्या ना कोणत्या भागात धाडी टाकत आहे. या कारवाईत सापडलेले भेसळयुक्त खाद्यपदार्थ नष्ट केले जात आहेत. तसेच संबंधित आस्थापनांचे परवाने रद्द केले जात आहेत. यामधून नावाजलेली दुकाने आणि खाद्यपदार्थांचे बडे ब्रँडसही सुटलेले नाहीत. त्यामुळे राज्यभरातील व्यावसायिकांना तुकाराम मुंढे आणि एफडीए या खात्याचा धसका घेतला आहे. राज्यातील नागरिकांकडून तुकाराम मुंढे यांना पाठिंबा मिळत असून एफडीएच्या कारवाईचे समर्थन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!