
हृदयद्रावक! पुण्यात नोकरी मिळाली पण शाम्पूच्या पुड्यांनी घात केला; तिघींचा मृत्यू…
परभणी: परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पुण्यातील एका नामांकित कंपनीत नुकतीच नोकरी मिळालेल्या युवतीसह तिची सख्खी बहीण आणि काकीचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या १५ दिवसांपूर्वी करिअरची नवी सुरुवात करणाऱ्या तरुणीची ही गावभेट अखेरची ठरल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृतांमध्ये उत्कर्षा उत्तम जाधव (वय २१), समीक्षा उत्तम जाधव (वय १८) आणि सिंधू दत्ता जाधव (वय ४५) यांचा समावेश आहे. तिघीही सोनपेठ तालुक्यातील रहिवासी होत्या. उत्कर्षा इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणासोबतच तिला नुकतीच पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली होती. पहिल्या नोकरीचा आनंद साजरा करण्यासाठी आणि आई-वडिलांना भेटण्यासाठी ती वीकेंडच्या सुट्टीत गावी आली होती.
View this post on Instagram
शनिवारी उत्कर्षा, तिची बहीण समीक्षा आणि काकी सिंधू या सोनपेठ तालुक्यातील मोहळा परिसरातील गोदावरी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी व पोहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी एका तरुणीच्या हातातील शाम्पूच्या काही पुड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागल्या. त्या पुड्या पकडण्याच्या प्रयत्नात तिने हातातील प्लास्टिकचा रिकामा डबा घेऊन नदीच्या खोल भागात प्रवेश केला. मात्र, डब्याचे झाकण उघडल्याने त्यात अचानक पाणी भरू लागले आणि तिचा तोल गेला. ती बुडू लागल्याचे पाहताच तिला वाचवण्यासाठी तिची बहीण पाण्यात उतरली. पण खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तीदेखील बुडू लागली. आपल्या दोन्ही पुतण्यांना संकटात पाहून त्यांना वाचवण्यासाठी काकी सिंधू जाधव यांनीही नदीत उडी घेतली. दुर्दैवाने, बचावाच्या प्रयत्नात त्या तिघीही खोल पाण्यात बुडाल्या.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर तिन्ही महिलांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे जाधव कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अवघ्या काही दिवसांपूर्वी उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या उत्कर्षाचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने गावकऱ्यांसह नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला आहे.
हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! चुलीवर मटण शिजत असतानाच मित्रांवर कोसळली वीज…
हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…
हृदयद्रावक! आईसोबत कपडे धुण्यासाठी गेले अन् कुटुंबातील तिंघाचा झाला मृत्यू…

