‘त्या’ माऊलीकडे पाहून मला खूप वाईट वाटले…

लॉककडाऊनमधे कोणीही विनाकारण फिरु नये म्हणून खूप मोठा स्टाफ , पोलिसांचा लवाजमा घेऊन आम्ही चौकात डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करत होतो.विनाकारण फिरनाऱ्या कार, मोटारसायकल, टपोरी मुले यांच्यावर कारवाईचा धडाका चालू होता.. हाताखालील स्टाफ जोशात काम करत होता.. आपल्याकडे आहे अधिकार म्हणून काही आगाऊ पोलिसांनी कुणाला नाहक त्रास देऊ नये याचीही दक्षता घेत होतोच.. तेवढयात लपत छपत जाणाऱ्या एका म्हातारीला व तीच्या मुलीला पोलिसाने पळत जावून पकडले व माझ्या समोर उभे केले..

“करोनाचा कहर झालाय आणि तुम्ही भर उन्हात लॉक डाऊन जाहीर होऊनही बिनधोकपणे रस्त्यावर फिरताय… तुमच्यावर कारवाईच करतो.” मी उगाच दरडाऊन बोललो.. खूप गरीब लोक दिसत होते.. म्हातारीचा एक पाय घोटयापासून वाकडा दिसला … घाबरून त्या दोघीही लटालटा कापायला लागल्या.. भर उन्हात आधीच त्यांच्या साडया, चेहरे घामाणे भिजले होते. “पिशवीत झाकून काय घेतलयस दाखव.” मी विचारले, त्यावर त्या तरूण महीलेने घाबरत,घाबरत तीच्याकडील कापडी पिशवी दाखवली.. त्यात मला एक चप्पल दिसली, ” काय हे, चप्पल…? ” मी आश्चर्याने विचारले.. ” हो दादा.. आईच्या एका पायाचे ऑपरेशन झाले, तीला डॉक्टरांनी आजच्या आज दवाखाण्यातून घरी घेऊन जायाला सांगीतल,, भावाला फोन केला तर तो त्याच्या घरात बायका मुलांना घेऊन कोंढून बसलाय, आला नाही. तूच आयला आण म्हणला… ह्या उन्हात स्टॅडपस्न चालत आलो दादा.. एका पायात आयला चप्पल दिली आणि दुसरी ही.” ते पाहून मला शॉक बसला.. अशा परिस्थीतीत स्टँडवरून आठ दहा किलोमीटर उन्हाच्या तडाख्यात चटका देणाऱ्या डांबरावरून, आजारी म्हाताऱ्या आईला आधार देत चालत आलेल्या त्या माऊलीकडे पाहून मला खूप वाईट वाटले. “माझ्या गाडीमधे एक एक्स्ट्रा चप्पल आहे ती घे ” असे म्हणून मी ती द्यायला उठलो. पण तीने घेण्यास साफ नकार दिला.. “पुढच्या गल्लीत तर राहतोय दादा, ” ती म्हणाली.

त्या दोघींनाही पोलिस गाडीत जबरदस्ती बसवून ड्रायव्हरला त्यांचे घरापर्यंत सोडून यायला सांगितले.. या छोट्याशा घटणेवरून घराच्या भिंतीवर रंगवलेल शासनाच वाक्य त्या क्षणी मला आठवल…. मुलग्यापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देई दोन्ही घरी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!