इर्शाळवाडीमधील बेपत्ता नागरिकांबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय…

रायगड : इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू असलेली शोधमोहिम तिसऱ्या दिवशी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत यांनी सांगितले की, ‘इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. २९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. दुर्घटनेत 57 जण बेपत्ता होते. त्यांना मृत घोषित करून आजपासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. दरम्यान, बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर शोधमोहिम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. शोधकार्यात पावसामुळे येत असलेल्या अनेक अडचणी आणि इतर कारणांमुळे ही शोधमोहिम थांबवली जाणार आहे.’

दरम्यान, इर्शाळवाडीमध्ये बुधवारी रात्री साडेदहा ते आकराच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. गावावर दरड कोसळली. या घटनेत गावातील अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेत आतापर्यंत 29 जणांनी आपला जीव गमावला आहे. अद्यापही काही जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या चार टीम, एकूण 100 जवान, टीडीआरएफचे 80 जवान, स्थानिक बचाव पथकाच्या 5 टीम तसंच अनेक स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक मदत करत आहेत. स्थानिक माहितीवरून या आदिवासी वाडीमध्ये एकूण 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे.

इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना बंदी…
इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळलेल्या घटनास्थळांचे ठिकाणी आणि त्याच्या परिसरात इर्शाळगड, नंबराची वाडी येथील दुर्घटनास्थळी, बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणूक केलेल्या इतर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना प्रवेशास निर्बंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार दिनांक 23 जुलै ते दिनांक 6 ऑगस्ट या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश उपविभागीय दंडाधिकारी कर्जत अजित नैराळे यांनी लागू केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!