बलात्कार करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची दहशत आवश्यक – सर्वोच्च न्यायालय…

नवी दिल्लीः बलात्कार करणाऱ्या समाजकंटकांच्या मनात कठोर कारवाईची भीती निर्माण झाली पाहिजे. असे कृत्य केल्यास आपल्याला ठार मारले जाऊ शकले, अशी दहशत त्यांना वाटली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना उद्देशून कडक शब्द वापरले आहेत. न्यायालयाने या बलात्कार प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. सुनावणी दरम्यान दिल्लीचे पोलिस आयुक्त अनुराग कुमार उपस्थित होते.

न्यायमूर्ती परडीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले, की केवळ सीसीटीव्ही असणे पुरेसे नाही. त्यावर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. सतत पाळत ठेवण्यासाठी पोलिसांकडे वृर रूमसारखी प्रणाली आहे गा, असा प्रश्न न्यायालयाने विचारला. प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटणे महत्त्वाचे आहे, मग ती रात्री रस्त्यावरून चालत असो किंवा मेट्रो वा बसमधून प्रवास करत असो, असेही न्यायालयाने निरीक्षण नोंदविले.

न्यायालयाने म्हटले, की दिल्लीत आणि देशात हजारो बेकायदेशीर हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यविक्री करणारी हॉटेल्स आहेत. अशा हॉटेलांवर कारवाई केली पाहिजे. तेथे समाजकंटक जमतात, मद्यपान करतात आणि त्यातूनच बेकायदा कृत्ये घडतात. गस्त यंत्रणा अधिक मजबूत करावी आणि गस्ती वाहनांनी असुरक्षित ठिकाणी थांबले पाहिजे.

न्यायालयातर्फे एक आदेश पारित करण्यात येईल. या आदेशानुसार कारवाई झाली पाहिजे. प्रलंबित खटल्यांची प्रगतीवरही न्यायालयाचे लक्ष राहील. आदेशाचा दुसरा भाग तत्काळ सुरक्षा उपायांवर लक्ष केंद्रित करेल. पोलिसांकडून उत्तर दाखल होईपर्यंत असे आणखी गुन्हे घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे. अशा समाजकंटकांवर तातडीने कारवाई केली पाहिजे. गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करा. मानवाधिकार कार्यकर्ते तुमच्यावर कलम २१ चे उल्लंघन केल्याचा आरोप करतील, पण पोलिसांनी कठोर भूमिका घेतलीच पाहिजे.

समाजातील प्रत्येक स्त्री आपली आई आणि बहीण आहे. आपण त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण केले पाहिजे. जसे आपण घरात महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतो, तसेच समाजातही घेतले पाहिजे. जर एखादी महिला बसमधून एकटी प्रवास करत असेल, तर तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे. तिची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही सक्रिय असले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!