
महात्मा गांधींची प्रतिमा असलेली नोट आक्षेपार्ह पद्धतीने हाताळण्याची रील पोस्ट केल्याबद्दल सुरतच्या महिलेस अटक…
सुरतः महात्मा गांधी यांचे चित्र असलेली ५०० रुपयांची नोट आक्षेपार्ह पद्धतीने हाताळलेली एक ‘रील’ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याच्या आरोपावरून, गुजरातमधील सुरतमध्ये एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेची ओळख सिमरन पटेल (वय ४७) अशी पटली असून, तिचे इन्स्टाग्रामवर दहा लाख फॉलोअर्स आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती शहरातील अडजान परिसरात राहाते आणि तिने गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला, १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.
सुरत पोलिसांनी त्यांच्या ‘एक्स हँडल’वरून सिमरन पटेल हिचा अटकेपूर्वीचा आणि नंतरची एक व्हीडिओ क्लिप पोस्ट करून अटक केल्याचे जाहीर केले आहे. पहिल्या क्लिपमध्ये ती चलनी नोट हाताळताना दिसत होती आणि दुसऱ्या क्लिपमध्ये तिच्या हातात बेड्या घातलेल्या दिसत होत्या.
व्हीडिओ ऑनलाइन पोस्ट केल्याबद्दल सिमरन पटेल माफी मागताना पोलिसांच्या व्हिडिओमध्ये दिसते आहे. पोलिसांनी सांगितले की, तिने पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेचा समावेश असलेली नोट हाताळताना तिने अनुचित दृश्ये आणि हावभाव केल्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते धर्मेश गामी यांनी पटेल यांच्या रीलबाबत तक्रार करण्यासाठी सुरत गुन्हे शाखेशी संपर्क साधल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करण्याशी संबंधित आहे.
सामाजिक तेढ निर्माण करण्याची क्षमता असलेली सामग्री पोस्ट करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
त्यांनी असेही सांगितले की, पटेल १७ वर्षांपूर्वी लग्नानंतर सुरतमध्ये स्थायिक झाल्या. त्या सोशल मीडियावर नियमितपणे छोटे व्हीडिओ तयार करून पोस्ट करत असतात. पोलिसांच्या माहितीनुसार, पटेलने इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे.

