
जंतर मंतरवर अनधिकृत आंदोलन; सौरभ दास व आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी…
नवी दिल्लीः कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) कार्यकर्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे जबरदस्तीने बेकायदा आंदोलन केल्याबद्दल, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दिल्ली न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अजिंक्य शिंदे याची सुटका करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे कार्यकर्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना, आंदोलनांसाठी प्रतिबंधित असलेल्या दिल्लीच्या जंतर मंतर परिसरात परवानगीशिवाय प्रवेश केल्याबद्दल ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. आता, सीजेपीच्या कायदेशीर व्यवहार प्रमुख, रत्ना सिंह यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की या दोघांना बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार होते.
त्यानंतर केलेल्या पोस्टमध्ये रत्ना सिंग यांनी या तिघांना मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात एससीएमसमोर हजर केले जाऊ शकते, असे म्हटले होते. त्यांनी दिल्ली पोलिसांना इशारा दिला, की २४ तासांची मुदत वेगाने जवळ येत आहे. दरम्यान, निर्बंध असूनही निदर्शने केल्याबद्दल मंगळवारी सकाळी जंतर मंतर येथे सीजेपीचे काही नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यापासून सीजेपी त्यांच्या सुटकेची मागणी करत आहे.
रत्ना सिंग यांनी दिल्ली पोलिसांवर मनमानी केल्याचा आरोप केला आणि ते वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करत असून, कायद्याला बगल देत असल्याचा दावा केला. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना जवळपास २४ तास वकिलांशी संपर्क साधण्यापासून रोखण्यात आले आणि त्यांच्या अटकेची किंवा ताब्यात घेण्याची कारणे सुरुवातीला कळवण्यात आली नव्हती. गुन्हेगार शहरात मोकाट फिरत असताना शांततापूर्ण आंदोलकांना थांबवले जात आहे.

