
पुणे! पिंपरी-चिंचवडमधील हत्येच्या गुन्ह्यात HIV बाधित महिलेला जामीन…
पुणे: सांगवी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी श्रीमती सेल्वराज राजंगम यांना पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणातील आरोपीने अॅड. प्रसाद विराज निकम व अॅड. मन्सूर तांबोळी यांच्या मार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
आरोपीविरुद्ध सांगवी पोलिस ठाणे येथे C.R. No. 303/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 25(4) व 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. २८ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मृत व्यक्तीसोबत सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादातून तसेच सातत्याने होत असलेल्या त्रासामुळे आरोपीने दगड व लोखंडी विळ्याने हल्ला केल्याचा आरोप होता. आरोपीने त्यानंतर स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन शस्त्रासह आत्मसमर्पण केले होते.
View this post on Instagram
आरोपीच्या वतीने अॅड. प्रसाद विराज निकम यांच्याकडून मांडण्यात आलेल्या युक्तिवादानुसार, आरोपी ५२ वर्षांची महिला असून ती HIV-संबंधित आरोग्य समस्यांनी त्रस्त आहे आणि तिला नियमित वैद्यकीय उपचार व देखभालीची आवश्यकता आहे. घटनेपूर्वी मृत व्यक्तीकडून सातत्याने त्रास, शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याचे तसेच घटनेच्या वेळी स्वतःवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आरोपीने स्वतःच्या संरक्षणासाठी कृती केली असून खून करण्याचा पूर्वनियोजित हेतू नव्हता, तसेच खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा अतिरेक झाला की नाही, हा मुद्दा पुराव्यानंतरच निश्चित होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला.
अॅड. प्रसाद विराज निकम यांच्याकडून पुढे असेही निदर्शनास आणून देण्यात आले की, आरोपीने स्वेच्छेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून तपासात सहकार्य केले आहे. तिच्याकडून आवश्यक ती शस्त्राची जप्ती झालेली असून पुढील कोणतीही महत्त्वाची जप्ती किंवा शोध बाकी नसल्याचे आणि तपास जवळपास पूर्ण झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. तसेच आरोपीला कोणतेही पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचेही नमूद करण्यात आले.
अभियोजन पक्षाने जामिनास विरोध करताना खाजगी संरक्षणाचा अधिकार आरोपीने ओलांडल्याचा दावा केला. तसेच मालमत्तेचा वाद अद्याप सुरू असल्याने भविष्यातील वादाची शक्यता आणि आरोपीकडून साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले. आरोपीच्या HIV स्थितीसंदर्भात कारागृह प्रशासनाकडून आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जातील, असा युक्तिवादही करण्यात आला.
न्यायालयाने आदेशात नमूद केले की, आरोपी HIV बाधित असल्याचे व तिच्या वैद्यकीय स्थितीबाबतचे अहवाल रेकॉर्डवर असल्याचे निर्विवाद आहे. आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केले असून शस्त्र आधीच जप्त झाले आहे. तसेच तपास बर्याच अंशी पूर्ण झाला असून तो अंतिम टप्प्यात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. आरोपीची वैद्यकीय स्थिती, तिने भोगलेला कोठडीतील कालावधी आणि तपासाची सद्यस्थिती विचारात घेऊन न्यायालयाने जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
न्यायालयाने आरोपीस रु. २५,०००/- च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व त्याच रकमेच्या एका जामीनदाराच्या हमीवर मुक्त करण्याचे आदेश दिले. तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे आणि कोणत्याही प्रकारे साक्षीदारांवर दबाव न आणणे, राहत्या पत्त्याची माहिती देणे आणि न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय निवासस्थान न बदलणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर; तब्बल साडे पाच वर्षांनंतर…
संतोष पंडित यांना जामीन मंजूर, पण कोर्टाने घातल्या दोन अटी; कोणत्या पाहा…
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणातील PSI बदने याला जामीन; पाहा 3 अटी…
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर…
कुख्यात डॉन अरुण गवळी याला अखेर जामीन मंजूर…

