
पाकिस्तानातून तमिळनाडूत होणारी ३ हजार कोटींची ड्रग तस्करी, भारतीय तटरक्षक दलाने हाणून पाडली; पाच पाकिस्तान्यांना अटक…
नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसचे अधिकारी आणि जवान, अरबी समुद्राच्या मध्यभागी संशयास्पदरित्या हालचाल करणाऱ्या आझाद नावाच्या एका इराणी जहाजावर पाळत ठेवून होत्या. अनेक दिवसांच्या पाळतीनंतर आणि पाठलागानंतर त्यांनी या जहाजाला अडविले. तपासणीमध्ये बोटीत एकूण ५२६ किलो अंमली पदार्थ सापडले. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य सुमारे ३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. या अंमली पदार्थांमध्ये सुमारे ४०० किलो मेथाम्फेटामाइन आणि १२६ किलो हेरॉईनचा समावेश आहे. जहाजावरील पाच पाकिस्तानी खलाशांनाही अटक करण्यात आली आहे.
या सागरी तस्करीचा मार्गही तपासात उघड झाला आहे. एटीएसच्या माहितीनुसार, इराणच्या कोनारक बंदरातून निघालेल्या ‘आझाद’ जहाजाजवळ, पाकिस्तानच्या ग्वादर बंदराजवळ एक छोटी बोट आली. याच बोटीतून अमली पदार्थांचा साठा ‘आझाद’वर चढवण्यात आला. समुद्रात तामिळनाडूस्थित एका जहाजाला तो माल सुपूर्द करण्याची योजना होती. आता या संपूर्ण आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा आणि अंमली पदार्थांच्या खऱ्या प्राप्तकर्त्यांचा तपास या यंत्रणा करत आहेत.
१० सप्टेंबर रोजी, गुजरात एटीएसचे निरीक्षक जे. एम. पटेल यांना माहिती मिळाली की, गुजरातमधील एक बराच काळ हवा असलेला संशयित, एका नायजेरियन नागरिकाच्या संपर्कात आहे. एटीएसच्या माहितीनुसार, या नेटवर्कचा वापर भारतात ५०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी केला जात होता. या माहितीनंतर, ‘आझाद’ या इराणी जहाजावर पाळत ठेवण्यात आली.
या अंमली पदार्थांच्या व्यवहारासाठीची आगाऊ रक्कम हवालामार्फत पाठवण्यात आली होती. मालाचा साठा आल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जाणार होती. एटीएस आता या व्यवहाराची आणि त्यात सामील असलेल्यांच्या सहभागाची चौकशी करत आहे.
गुजरात एटीएसने तटरक्षक दलाच्या मुख्यालयाच्या ऑपरेशन्स शाखेसोबत एक संयुक्त पथक तयार केले. तांत्रिक कारणांमुळे, एटीएस पथकाला कोची येथून तैनात करण्यात आले. त्यानंतर, समुद्रातील संशयास्पद बोटींवर पाळत आणि तपास सुरू झाला. अधिकृत माहितीनुसार, ही मोहीम अंदाजे १७ दिवस चालली.
२५ सप्टेंबर रोजी, ‘आझाद’ हे जहाज लक्षद्वीपच्या वायव्येस सुमारे १६० सागरी मैल आणि मुंबईच्या नैऋत्येस ४९० सागरी मैल अंतरावर आढळली. सागरी आणि हवाई पाळत ठेवल्यानंतर, तटरक्षक दलाने ती बोट अडवली आणि तिची झडती घेतली. त्यानंतर, सशस्त्र बंदोबस्तात ती बोट, त्यातील व्यक्ती आणि जप्त केलेले अमली पदार्थ मुंबईत आणण्यात आले.
मोहम्मद याकूब बलुची, शाकिरुल्ला, फरीदुल्ला, अहमद खान आणि वाहिदुल्ला खान यांना बोटीतून अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व पाकिस्तानमधील पेशावरचे रहिवासी आहेत. चौकशीदरम्यान असे उघड झाले की, ‘आझाद’ हे जहाज इराणमधील कोनारक येथून निघाली होती आणि ग्वादरहून एका लहान बोटीने समुद्रात तिच्यापर्यंत अमली पदार्थांचा साठा पोचविण्यात आला होता.
एटीएसच्या माहितीनुसार, हा माल समुद्रात तामिळनाडूच्या एका बोटीवर पोचवायचा होता. त्यानंतर वेगवेगळ्या वाहनांमार्फत विविध शहरांमध्ये या अमली पदार्थांची वाहतूक करण्याची योजना होती. तपास यंत्रणा या मालाच्या अंतिम प्राप्तकर्त्याचा आणि भारतातील या नेटवर्कमध्ये सामील असलेल्या विविध व्यक्तींचाही तपास करत आहेत.
५२६ किलोमध्ये काय आढळले?
* सुमारे ४०० किलो मेथाम्फेटामाइन
* सुमारे १२६ किलो हेरॉईन
* एकूण जप्ती: ५२६ किलो
जप्त केलेले अमली पदार्थ, बोट आणि आरोपींना पुढील संयुक्त चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. गुजरात एटीएस या प्रकरणात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नेटवर्क, हवाला व्यवहार आणि कथित स्वीकारकर्त्यांशी असलेल्या संबंधांची चौकशी करत आहे.

