पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसची धक्कादायक माहिती…
पुणे : कोथरुड पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे. एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्यांना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर जेव्हा आरोपींची चौकशी सुरू केली तेव्हा धक्कादायक अशी माहिती समोर आली. आरोपींनी ओळखीच्या लोकांची नावे म्हणून हिंदू धर्मातील नावे सांगितली होती. मात्र जेव्हा प्रत्यक्षात ट्रू कॉलरवर त्यांनी सांगितलेले नंबर डायल करण्यात आले तेव्हा ती मुस्लिम असल्याचे आढळले. यावरून पोलिसांना संशय आला होता. पुढील तपासादरम्यान संबंधित आरोपी हे एनआयएला वाँटेड असणारे दहशतवादी असल्याचे समजले होते.
आरोपींना कोथरूड पोलिस स्टेशनला आणून एक टीम त्यांच्या कोंढव्यात भाड्याने राहत असलेल्या घरी पाठवली होती. तिथे पोलिसांना बंदूकीची एक गोळी आणि पिस्तूलाचे कव्हर, एक कुऱ्हाड आणि लॅपटॅाप सापडले. लॅपटॅाप तपासल्यावर प्रत्येक फाईल लॉक असल्याचे पोलिसांना लक्षात आले. एक्सपर्टच्या मदतीने हे लॅाक क्रॅक केल्यानंतर त्यात काही इस्लामिक साहित्य सापडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आणि एटीएसला पाचारण करण्यात आले. वरिष्ठ अधिकारी चौकशीत सहभागी झाल्यावर चक्र वेगाने फिरली आणि एनआयए ने हे आरोपी राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये मार्च २०२२ मध्ये सापडलेल्या स्फोटकाच्या प्रकरणातले फरार आरोपी असल्याच स्पष्ट केले.