
मुंबई पोलिस दलातील कंत्राटी भरतीचे वृत्त गृह विभागाने फेटाळले…
मुंबईः मुंबई पोलिस दलात कंत्राटी स्वरुपात पोलिस भरती होणार असल्याचे बातमी प्रसिद्ध झाली होती. पण, पोलिस दलामध्ये कोणत्याही प्रकारची कंत्राटी भरती होणार नाही. संबंधीत वृत्त गृह विभागाने फेटाळले आहे. शिवाय, कंत्राटी पद्धतीने भरतीच्या बातम्या चुकीच्या असल्याचे देखील सूत्रांनी म्हटले आहे.
कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला असून, याची सुरुवात मुंबई पोलिस दलातून केली जाणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. विधिमंडळ अधिवेशनातही विरोधकांनी सरकारवर या मुद्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर गृह विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे.
राज्यामध्ये बेरोजगारीचा गंभीर विषय असताना राज्यात कंत्राटी पद्धतीने तीन हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत 289 अनव्ये कंत्राटी पद्धतीने पोलिस भरतीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात प्रखर विरोध दर्शविला होता.
विधिमंडळात आणि सर्वसामान्यांमध्येही पोलिस दलातील कंत्राटी भरतीच्या मुद्यावर नाराजी दिसून आली होती. याबाबत गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पोलिस दलातील कंत्राटी भरतीबाबतचे वृत्त धादांत खोटे आहे. पोलिस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची होत नाही आणि होणारही नाही, असेही सूत्रांनी सांगितले.