पैशासाठी आईचा खून करणाऱ्या आरोपी मुलास जन्मठेप…
बार्शी (आकाश वायचळ): आईचा खून केल्या प्रकरणी श्रीराम नागनाथ फावडे (रा. वाणी प्लॉट, बार्शी) याला बार्शी येथील सत्र न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बार्शी शहर पोलिस स्टेशनचे हद्दीत आरोपी श्रीराम याने त्याची आई रुक्मिणी फावडे या पैसे देत नव्हत्या व पैशाच्या कारणावरून घरी सतत भांडणे होत होती, यामुळे आरोपीने रागाच्या भरात आईच्या डोक्यात दगड मारून ठार केले होते. याप्रकरणी त्याच्यावर दिनांक १३ ऑक्टोंबर २०२१ रोजी बार्शी शहर पोलिसात भारतीय दंड संहिता कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.
सदरील प्रकरणात अभियोग पक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचा पुरावा व सरकार पक्षातर्फे श्रीमती राजश्री कदम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी श्रीराम फावडे यास जन्मठेपेची शिक्षा व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे राजश्री कदम यांनी काम पाहिले तर, कोर्ट पैरवी म्हणून पो. शि. बाळासाहेब चौधरी यांनी मदत केली. सदरील प्रकरणामध्ये तपासी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी काम पाहिले तर दफ्तरी म्हणून पो. हे. का. गणेश वाघमोडे यांनी काम पाहीले. मार्गदर्शक म्हणून जालिंदर नालकुल SDPO बार्शी, संतोष गिरीगोसावी PI (प्रभारी अधिकारी बार्शी शहर पो. स्टेशन ) यांनी भूमिका बजावली.