समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या २५ प्रवाशांना श्रद्धांजली; गुन्हा दाखल…
बुलढाणा: समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी खाजगी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 25 प्रवाशांना अपघातस्थळीच श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वामी समर्थ मंडळाकडून शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात होणार नसल्याचा दावा करणाऱ्या निलेश आढाव या युवकाविरुद्ध सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 2 आणि 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावर देव धाबा गावाजवळ एक जुलै रोजी खाजगी बसला अपघात होऊन भीषण आग लागली होती. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला होता. या प्रवाशांना श्रद्धांजली म्हणून स्वामी समर्थ केंद्र सिंदखेडराजा यांनी एक श्रद्धांजली कार्यक्रम अपघात स्थळी म्हणजे समृद्धी महामार्गाजवळ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे आणि पूजेचे व्हिडीओ निलेश आढाव या स्वामी समर्थ केंद्राच्या पदाधिकाऱ्याने व्हायरल करून अशी पूजाअर्चा केल्याने यापुढे अपघात होणारच नाही, असा दावा केला होता. याची दखल सिंदखेड राजा पोलिसांनी घेत या तरुणाविरुद्ध जादूटोणा व अनिष्ट रूढी प्रतिबंधक कायद्याच्या कलम दोन आणि पाच नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अपघातात 25 प्रवाशांच्या जिवंत होरपळून मृत्यू झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण होते. समृद्धी महामार्गाच्या बाजूला असलेल्या गावात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांची भीती दूर व्हावी या हेतूने हा श्रद्धांजली व पूजाचा कार्यक्रम घेण्यात आला होता, अशी माहिती निलेश आढाव याने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. आमचा कुठलाही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही व नव्हता. परंतु जर अनावधानाने माझ्या बोलण्याने काही अंधश्रद्धा पसरली असेल तर मी माझे शब्द परत घेतो, असेही निलेश आढाव याने म्हटले आहे.