
प्रेम प्रकरणातून चंद्रपूर हादरले! अंगावर खाकी चढवली अन् तिसऱ्या दिवशी खुनात अडकली…
चंद्रपूर : तब्बल तीन वर्षांनंतर एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे एका महिला पोलिस कर्मचाऱ्यानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जयंत बाल्लावार हे पोलिस विभागात कार्यरत होते. ड्युटीवर असतानाच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, तब्बल ३६ महिन्यांनंतर या गुन्ह्याचा छडा लागला आहे. त्यांचीच मुलगी आर्या बाल्लावार हिने वडिलांना मिल्कशेकमध्ये विष मिसळून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्या बाल्लावार हिचे आशिष शेडमाके याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना वडील जयंत बाल्लावार यांचा तीव्र विरोध होता. याच रागातून तिने हे धक्कादायक कृत्य केले.
या कृत्यासाठी आर्या बाल्लावार हिने तिचा मावसभाऊ चैतन्य गेडाम याच्याकडून ५ हजार रुपयांना विष विकत घेतले होते.

वडिलांच्या मृत्यूनंतर तिने प्रियकर आशिष शेडमाके याच्यासोबत लग्नही केले. लग्नानंतर आर्या बाल्लावार आणि आशिष शेडमाके यांच्यात सतत खटके उडू लागले. आशिष शेडमाके याला त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे पोलिस ट्रेनिंगमधून बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे तो बेरोजगार होता, तर आर्या बाल्लावार सासरी न राहता माहेरीच राहात होती. याच कौटुंबिक वादातून संतापलेल्या आशिष शेडमाके याने अखेर पोलिस ठाणे गाठले आणि स्वतःच्याच पत्नीचे बिंग फोडले. ज्या व्यक्तीसाठी आर्या बाल्लावार हिने स्वतःच्या वडिलांचा जीव घेतला, त्याच व्यक्तीने तिचे पितळ उघडे पाडले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी आर्या बाल्लावार, तिचा पती आशिष शेडमाके, विष पुरवणारा चैतन्य गेडाम आणि त्यांच्या आणखी एका साथीदाराला अटक केली आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या हातांनीच असा गुन्हा केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष शेडमाके आणि आर्या बाल्लावार या दोघांचेही व्हॉईस सॅम्पल्स पोलिसांकडून घेण्यात आले असून ते नागपूर येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन आधीच जप्त केले आहेत. तीन वर्षांपूर्वी रचलेला हा कट आणि त्यादरम्यान झालेली संभाषणे यांचे धागेदोरे मिळवण्यासाठी हे व्हॉईस सॅम्पलिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आरोपींनी एकमेकांशी केलेल्या संवादाची पुष्टी करण्यासाठी प्रयोगशाळेचा अहवाल या खटल्यात मुख्य पुरावा ठरू शकतो.
मृत जयंत बाल्लावार यांच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण काय होते, याबाबतही पोलिस तपास करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता रासायनिक विश्लेषणाद्वारे विषबाधेची पुष्टी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रियकर आशिष महेश शेडमाके, कॉन्स्टेबल मुलगी आर्या जयंत बाल्लावार आणि चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम या तिघांना अटक केली आहे. तिघांनाही पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती एसडीपीओ प्रमोद चोगुले यांनी दिली.
प्रेमविवाहानंतर पोलिसाने गर्भवती असलेल्या कमांडो पत्नीला संपवलं…
प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक…
पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..
प्रेमसंबंधाच्या चर्चेला उधाण! पोलिस अधिकाऱ्यासोबत बायकोला रंगहात पकडले अन्…
प्रेम! पोलिस अधिकारी असलेल्या मैत्रिणीला लष्करातील जवानाने संपवलं अन्…

