परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…
कोलकताः देशात सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिन मीना प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असतानाच बांग्लादेशात राहणारी युवती सीमा ओलांडून भारतात आली आणि हिंदू धर्म स्वीकारत रिती-रिवाजानुसार लग्न करत युवकाला बांग्लादेशात घेऊन गेली आहे. मात्र तिथे त्याच्यासोबत भयंकर प्रकार सुरू असल्याची तक्रार मुलाच्या आईने दिली आहे.
बांग्लादेशात राहणाऱ्या जूली या युवतीचे मुरादाबाद येथे राहणाऱ्या अजयसोबत फेसबुकवरुन मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर ती लग्न करण्यासाठी बांग्लादेशवरुन भारतात आली. भारतात येऊन तिने हिंदू धर्म स्वीकारत रिती-रिवाजानुसार अजयसोबत लग्न केले. मात्र, लग्नाच्या काही दिवसांनंतरच अजयला बांग्लादेशात घेऊन गेली. मात्र, काहीच महिन्याने त्याचा रक्ताने चेहरा माखलेला फोटो त्याच्या कुटुंबियांना मिळाला. या घटनेने सध्या मोठी खळबळ उडाली आहे. अजयच्या आईने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
महिलेने पोलिसांना एक पत्र पाठवले आहे. यात तिने मुलाला बांग्लादेशातून परत आणण्याची विनंती केली आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून तिचा मुलगा अजय बांग्लादेशात राहणाऱ्या जुलीसोबत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत होता. त्यानंतर जूली 3 महिन्यांनी तिच्या 11 वर्षांच्या मुलीसह मुरादाबाद येथे आली. तिथे त्याच्या परिवारासोबत काही दिवस राहून तिने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आणि लग्न केले.
जुलीच्या व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी ती पुन्हा बांग्लादेशात गेली. काही दिवसांनी अजयचा फोन आला की तो बांग्लादेशात असून 10 ते 15 दिवसांत परत येईल. काही दिवसांतच पुन्हा अजयचा फोन आला आणि त्याने त्याच्या आईकडे पैशांची मागणी केली आणि फोन कट झाला. त्यानंतर त्याच्या आईच्या व्हॉट्सअॅपवर मुलाचा फोटो आला. त्यात त्याचा चेहरा रक्ताने माखलेला आहे. मुलाचा फोटो पाहून त्याची आई घाबरली आणि तिने पोलिस स्टेशन गाठले. माझ्या मुलाला पुन्हा भारतात घेऊन यावे, अशी विनंती तिने केली आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.