सीमा हैदर आणि सचिन मीनाला ATSने चौकशीसाठी घेतले ताब्यात…
नवी दिल्लीः प्रियकरासाठी पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर सध्या चर्चेत आहे. अवैधरित्या भारतात आल्यामुळे तिला पोलिसांनी अटक करुन नंतर जामिनावर सुटका केली होती. यूपी एटीएसने सीमा हैदरसह तिचा पती सचिन सीमा आणि सचिनच्या वडिलांना चौकशीसाठी अज्ञातस्थळी नेले आहे.
एटीएसचे पथक साध्या वेशात सचिनच्या ग्रेटर नोएडा येथील घरी आज (सोमवार) दुपारी पोहोचले आणि दोघांना सोबत घेऊन गेले. यादरम्यान मीडियालाही त्या परिसरात बंदी घालण्यात आली होती. एटीएसने सीमा आणि सचिनला नेमकं कुठे नेले आणि कितीवेळ चौकशी करणार, याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही.
दरम्यान, गुप्तचर विभागाने सीमा हैदरचा संपूर्ण रुटमॅप तयार केला आहे. सीमा पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात कशी दाखल झाली, याचा तपास केला जाणार आहे. यात नेपाळमधील वास्तव्य, कोणाला भेटली, या सर्व गोष्टींची माहिती घेतली जाईल. तपास यंत्रणेचे एक पथक नेपाळमध्ये ही सर्व माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जात आहे.
सीमा हैदर गेल्या अनेक दिवसांपासून भारतात चर्चेचा विषय आहे. सीमावर हेरगिरीचे आरोप आहेत. पाकिस्तानी आयकार्डवर तिची जन्मतारीख चुकीची असूनही सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवण्यासाठी तुम्ही कशाची वाट पाहत आहात? सीमाबद्दल अनेक खुलासे होत असताना तिला इथे का ठेवले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.