पुणे! विजयस्तंभावर शौर्य दिनानिमित्त वाहतुकीत मोठे बदल अन् पोलिसांचे आवाहन…

पुणे (संदिप कद्रे): पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे 1 जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभावर शौर्य दिन व अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे बदल 31 डिसेंबर सकाळी 10 वाजल्यापासून 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. या काळात चाकण, शिक्रापूर, आळंदी आणि तळेगाव परिसरातील अनेक प्रमुख रस्ते खाजगी वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले आहेत.

चाकण ते शिक्रापूर मार्गावर काही दिवस सर्व खाजगी वाहनांना दोन्ही मार्गाकडून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या मार्गावर फक्त अनुयायांच्या बसेसना परवानगी देण्यात आली आहे. मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने आणि मालवाहतूक ट्रक आता तळेगाव–चाकण मार्गाऐवजी वडगाव मावळ, म्हाळुंगे, खेड आणि नारायणगाव मार्गे वळवली जातील. आळंदी फाटा, मोशी चौक आणि पांजरपोळ परिसरातून जाणाऱ्या अवजड वाहनांवरही पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये नाशिककडून येणाऱ्या बसेस चाकण मार्गे शिक्रापूर याठिकाणी पोहोचतील, तर मुंबईकडून जुन्या महामार्गाने येणाऱ्या बसेस वडगाव फाटा–म्हाळुंगे–चाकण मार्गाने नेल्या जातील. हलकी वाहने, आळंदी–मरकळ–तुळापूर मार्गे लोणीकंद पार्किंगकडे वळवली जातील. मरकळ येथील इंद्रायणी पुलावर 8 फूट उंचीचे अडथळे असल्यामुळे, त्यापेक्षा जास्त उंचीची वाहने या मार्गावरून जाऊ शकणार नाहीत, असे पोलिसांनी सांगितले आहे.

MIDC परिसरात या काळात जड वाहनांना अनुयायांसाठी निश्चित केलेल्या मार्गांवर जाण्याची मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे लोणीकंदकडे जाणाऱ्या खाजगी वाहनधारकांनी अलंकापुरम चौक (तापकीर चौक) किंवा चऱ्होली फाटा हे मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरातून विश्रांतवाडी मार्गे आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांनाही मज्जाव करण्यात आला असून, त्यांना वाघोली मार्गे लोणीकंदकडे जाणे अपेक्षित आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि अन्य अत्यावश्यक सेवा वाहनांना या नियमातून सूट दिली जाणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे वाहतूक शाखेकडून आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या लक्षावधी अनुयायांना सुरक्षितता पुरविण्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच महाराष्ट्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता यांचे सह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. यावेळी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रश्नांविषयी त्यांनी आयोजक व स्थानिकांशी चर्चा देखील केली. यंदाचा उत्सव निर्विघ्नपणे तसेच कोणत्याही तणावाशिवाय पार पडणार असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता एक जानेवारी रोजी अभिवादनासाठी यावे, असे आवाहन यावेळी आयुक्तांकडून करण्यात आले.

यावेळी पुणे सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील , पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, संदिप भाजीभीकरे, हिंम्मतराव जाधव यांचेसह अनेक अधिकारी उपस्थित होते.

पुणे! नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांची कडक नियमावली, उल्लंघन केल्यास थेट…

सुरक्षित पुणे पुरस्कार २०२५! सुरक्षा, संरक्षा आणि सुशासनातील नेतृत्वाचा सन्मान

पुणे-नगर रस्त्यावर ट्रॅव्हल्स गाड्यांचे साम्राज्य; पोलिसांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष…

पुणे शहरात नवीन पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी; पाहा रचना…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!