
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन…
पुणे: ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर (वय ७३) यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. पण अखेर आज (सोमवार) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्यांनी आपल्या कलेची छाप पाडली. ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख मिळवून देण्यातही त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मधू कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केले. कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर 1973 मध्ये मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. लावणी आणि लोकनृत्याच्या सादरीकरणातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
View this post on Instagram
तमाशानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी ते दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधू कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’, ‘रावसाहेब’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या. त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केलं. चित्रपटांसोबतच लोकनाट्य आणि रंगभूमीवरही त्या सक्रिय होत्या. 1977 मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीमध्ये नृत्यनाट्य सादर केले. त्यांच्या लावणीतील सहजता, अभिनय आणि हावभाव यामुळे त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळाली.
‘शापित’, ‘हेच माझं माहेर’ आणि ‘राघू मैना’ यांसारख्या चित्रपटांतील कामासाठी त्यांना पुरस्कार मिळाले. ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमातून त्यांनी लावणीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अमेरिका, दुबई, अबुधाबी आणि मॉरिशस येथेही या कार्यक्रमाचे प्रयोग झाले. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी लावणीचं प्रशिक्षण दिले. लोककलेशी असलेली नाळ कायम जपत मधू कांबीकर यांनी आपल्या चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत मराठी मनोरंजनविश्वाला समृद्ध केले.
‘छावा’मध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप; धक्कादायक योगायोग…
पिंजरा! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन…
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन…
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन…
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन…

