
महाराष्ट्राचे सुपूत्र अन् IPS विनायक भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई…
मेरठ (उत्तर प्रदेश) : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना कट्टरतावादी विचारांकडे वळविण्याचा आणि देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा कथित प्रयत्न उघडकीस आला आहे. मेरठ पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या तपासाला सहकार्य करत उजैद (वय २२) याला अटक केली आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानशी संबंधित संशयित ऑनलाइन नेटवर्क आणि त्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या कथित कारवायांचा तपास ऐरणीवर आला आहे.
संपूर्ण कारवाईत महाराष्ट्राचे सुपुत्र आणि मेरठचे एसपी सिटी विनायक गोपाल भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक बी.बी.जी.टी.एस. मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक भोसले यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले. कोतवाली पोलीस आणि SWAT टीमने संयुक्तपणे तपासाची चक्रे वेगाने फिरवत उजैदचा शोध घेतला. अखेर दहा महिन्यांपासून फरार असलेल्या उजैदला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
View this post on Instagram
पोलिसांच्या तपासानुसार, उजैद सोशल मीडियावर भारतविरोधी सामग्री पाहत होता. एका व्हिडिओवर त्याने ‘हम भी तैयार हैं’ अशी कमेंट केली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील मोहम्मद साजिद याच्याशी त्याचा संपर्क आला. पुढे इन्स्टाग्राम, सेशन आणि सिग्नल या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याचे संशयित व्यक्तींशी संपर्क वाढल्याचा आरोप आहे. तपासात ‘Tuition-40’, ‘Brigade’ आणि ‘Al-Muzzahid’ या नावांनी ऑनलाइन ग्रुप चालवले जात असल्याचे समोर आले. या ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील काही संशयित व्यक्ती सहभागी असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
या प्रकरणातील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे १४ ते १८ वयोगटातील मुलांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावरील संदेश, ऑडिओ आणि व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला जात होता. उजैदकडून काही किशोरांना प्रक्षोभक ऑडिओ पाठवले जात असल्याची माहितीही तपासात पुढे आली. एसपी सिटी विनायक गोपाल भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, उजैदच्या सोशल मीडिया संपर्कांची आणि त्याच्याशी जोडलेल्या तरुणांची चौकशी सुरू होती. या नेटवर्कमध्ये आणखी कोण सहभागी आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांच्या तपासात नोव्हेंबर २०२५ मध्ये लष्कराच्या मोठ्या कॅम्पवर किंवा लष्करी ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्याचा कथित कट उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला आहे. या कटामध्ये रेकी करणे, शस्त्रे आणि स्फोटक जॅकेटची व्यवस्था करणे तसेच प्रशिक्षणाची तयारी करणे अशा जबाबदाऱ्या निश्चित केल्याचे तपासात समोर आले आहे. जम्मू-काश्मीरमधील बाहू फोर्ट पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासातून उजैदचे नाव पुढे आले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी यापूर्वीही मेरठमध्ये छापे टाकले होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
विनायक भोसले यांच्या पथकाच्या तपासाला यश…
जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत मेरठ पोलिसांनी डिजिटल संपर्क, सोशल मीडिया अकाउंट आणि संशयितांच्या नेटवर्कचा तपास पुढे नेला. एसपी सिटी विनायक गोपाल भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. अखेर उजैदला अटक करण्यात यश मिळाले. अटक केलेल्या आरोपीची सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू असून, त्याच्या डिजिटल संपर्कांचे, आर्थिक व्यवहारांचे आणि इतर संशयितांशी असलेल्या संबंधांचे धागेदोरे तपासले जात आहेत.
महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया…
IPS विनायक भोसले यांनी शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा केला पर्दाफाश…
IPS विनायक भोसले यांनी बनावट कर्ज टोळीचा केला पर्दाफाश…
IPS विनायक भोसले यांची संवेदनशीलता ठरली निर्णायक; कामगिरीचे सर्वत्र होतेय कौतुक…
Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी…

