व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी…
धाराशिव: व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून कानेगाव (ता. लोहारा) येथे बुधवारी (ता. १४) सकाळी दोन राजकीय गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी दोन्ही गट लोहारा पोलिस ठाण्यात आले होते. पण, पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांनी दोन्ही गटांची समजूत काढून आपसातील वाद मिटविला.
कानेगाव येथे शिवसेना, काँग्रेस हे दोन राजकीय गट प्रबळ आहेत. अडीच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सत्ता उलथवून शिवसेने एक हाती सत्ता मिळवली आहे. मागील वर्षभरापासून सत्ताधारी व विरोधी गटात कुरघोडी सुरू झाली. सध्या ग्रामपंचायतीला मोठा निधी उपलब्ध झाल्याने गावात विकास कामे सुरू आहेत. बहुतांश कामे निकृष्ट होत असून त्यात मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारही दिली होती. त्यावरून विस्तार अधिकारी यांनी चौकशी सुरू केली.
सत्ताधारी गटातील एका ग्रामपंचायत सदस्याने विरोधकांना डिवचण्यासाठी व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवले. स्टेटस पाहून विरोधी गटातील कार्यकर्ते खवळले. दरम्यान, स्टेट्स का आणि कोणासाठी ठेवला असा जाब विचारण्यासाठी विरोधक संबंधित ग्रामपंचायत सदस्यांकडे गेले. त्यावेळी सरपंचासह कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. स्टेटसबाबत विचारणा सुरू करताच दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यात सरपंच, त्यांचे बंधू व ग्रामपंचायत सदस्य जखमी झाले आहेत. परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यासाठी दोन्ही गट लोहारा पोलिस ठाण्यात आले. तक्रार देण्यासाठी दोन्ही गट आग्रही होते. यावेळी पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांनी दोन्ही गटाची समजूत काढली, वादाने वाद वाढत असतो. त्यातून काही साध्य होत नाही. वादामुळे गावचे सामाजिक स्वास्थ्य बिघडते, असे सांगून दोन्ही गटात समेट घडवून आणला. पुन्हा वाद करणार नाही, असे दोन्ही गटाकडून लेखी लिहून घेतले आहे. पण, संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.