माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…
सांगली: अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माता न तू वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. विटा पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे (वय 28, रा. लेंगरे) आणि तिचा प्रियकर रुपेश नामदेव घाडगे (वय 25, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रुपेश घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. ज्योती हिचे लग्न झाले असून तिला शौर्य हा सहा वर्षाचा मुलगा होता. मात्र, ज्योती आपल्या नवऱ्यासोबत राहत नसून त्या दोघांनी घटस्फोटची घेण्याची प्रक्रिया देखील सुरु केली होती. ज्योती आणि रुपेश या दोघांना लग्न करायचे होते. परंतु, या लग्नामध्ये चिमुकल्या शौर्यचा दोघांना अडथळा वाटत होता. त्यामुळे दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचला होता. सहा मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या आई म्हणजे ज्योती लोंढेने दिली होती. दुसरीकडे रुपेशने शौर्यला दुचाकीवरुन नेऊन एका विहिरीत फेकून दिले होते.
विटा पोलिस चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते. विहिरीत चिमुकल्या शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात ज्योती आणि रुपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती पुढे आली. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी शौर्यचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेने खानापूर तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.