पुणे शहरातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली बळकावण्याचा प्रयत्न; शिवाय…
पुणे : पुणे शहरातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध वैशाली हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप हॉटेल मालकाच्या मुलीने तिच्या पतीवर केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
बंदुकीचा धाक दाखवून त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप मालकाच्या मुलीने (वय ३४) केला आहे. शिवाय, लग्नाआधी त्याने बलात्कार केल्याचा आरोपही फिर्यादी महिलने केला आहे. पती, दिर आणि सासू सासऱ्यांविरोधात महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. विश्वजीत विनायकराव जाधव (वय 38), अभिजित विनायकराव जाधव (वय 40), विनायकराव जाधव (वय 65), वैशाली विनायकराव जाधव (वय 60) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जून 2018 ते आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी पती विश्वजीत याने फिर्यादीला 2018 मध्ये घोले रोड येथील राहत्या घरी नेले आणि दारु व ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. आरोपीने पिस्टलचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून घेतली. फिर्यादीच्या कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या चार महागड्या कार परस्पर विकल्या. तसेच फिर्यादी यांचे एक कोटी 70 लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या कार फिर्यादी आणि त्यांचा भाऊ वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.