संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!
नाशिक: पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी शुक्रवारी (ता. २४) नाशिकच्या पोलिस आयुक्त पदाचा पदभार तत्कालीन आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून स्वीकारला. सर्वप्रथम त्यांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका मंदिरात जाऊन दर्शन घेत आयुक्तालयात प्रवेश केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनियुक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, ‘तत्कालीन आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिकमध्ये चांगले काम केले आहे. यापुढे वाहतुकीसह कायदा आणि सुव्यवस्थेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांशी चर्चा करून पाऊले उचलले जातील. आगामी लोकसभा व विधानसभा तसेच अन्य निवडणुका आणि राजकीय घडामोडी बघता आवश्यक ती पावले उचलली जातील. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता वेळ पडल्यास कठोर पाऊले देखील उचलले जातील. महिला सुरक्षेकडे विशेष लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना आखल्या जाणार आहेत. पुणे शहरात असताना नागरिकांचा थेट पोलिस आयुक्तांशी संवाद व्हावा याकरिता व्हॉट्सअप नंबर जारी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याकरिता व्हॉट्सअप नंबर जारी करण्याबाबत विचाराधीन आहे.’
‘ड्रग्ज प्रकरणी जे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा तपास होऊन जे पुरावे समोर आले आहेत, त्यावर काम करणार आहे. या प्रकरणाचा शेवट करण्याचा माझा प्रयत्न असेल. पुणे शहरापाठोपाठ नाशिकमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचे मी माझे भाग्य समजतो. चांगल्या कामगिरीतून नाशिककरांना दिलासा देण्याचा माझा प्रयत्न असेल. कोअर पोलिसिंग करण्यावर भर देतानाच नागरिकांच्या तक्रारींना पोलिसांचा योग्य प्रतिसाद देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,’ असेही संदीप कर्णिक म्हणाले.
दरम्यान, पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी ग्रामदेवता कालिकामातेचे दर्शन घेतले. आपण ज्या ठिकाणी जातो, तेथील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करीत असल्याचे आयुक्त कर्णिक यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी राज्य गुप्तवार्ता आणि व्हीआयपी सुरक्षा विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली झालेले माजी आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार सोडल्याची स्वाक्षरी केली. यावेळी उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे हे अधिकारी आयुक्तांच्या दालनात उपस्थित होते.
पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!