पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!
पुणे (संदीप कद्रे) : पुणे शहरचे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्याचे आदेश गृहविभागाने मंगळवारी (ता. २१) सायंकाळी दिले. नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) मुंबई कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संदीप कर्णिक यांनी पावणेदोन वर्ष सहपोलिस आयुक्तपद भूषविले होते. गणेशोत्सव बंदोबस्तासह महत्वाच्या बंदोबस्ताची धुरा कर्णिक यांनी हाताळली होती. पुणे शहराचे सहपोलिस आयुक्तपद भूषविताना कर्णिक यांनी विविध सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत कर्णिक यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. विविध संस्था, संघटनांच्या कार्यक्रमात कर्णिक यांची उपस्थिती असायची. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात कर्णिक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संदीप कर्णिक यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकून सोडविण्याचे काम केले आहे. यामुळे काही दिवसांमध्येच त्यांनी पुणेकरांना जिंकले होते.
दरम्यान, शासनाच्या गृह मंत्रालयाकडन मागील दोन दिवसांत भापोसे व रापोसे सेवेतील वरिष्ठ श्रेणीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात येत आहेत. सोमवारी रात्री उशीराही पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. यानंतर मंगळवारी पुन्हा अंकुश शिंदे व संदीप कर्णिक यांच्या बदली आदेश अवर सचिव स्वप्निल बोरसे यांच्या स्वाक्षरीने स्वतंत्ररित्या काढण्यात आले. शुक्रवारी १६ डिसेंबर २०२२ रोजी मावळते पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून नाशिक पोलिस आयुक्तपदाची सुत्रे अंकुश शिंदे यांनी स्वीकारली होती. शिंदे यांची अवघ्या ११ महिन्यात शासनाकडून बदली करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपुर्वी नाशिक शहरात एका आठवड्यात झालेल्या खूनाच्या घटनांमुळे गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!