सीजेपीचे जंतर मंतरवर आंदोलन, गुरुग्राममधील घरातून युट्युबर ध्रुव राठीला घेतले ताब्यात – सीजेपीचा दावा…

नवी दिल्लीः मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी), ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ व इतर विद्यार्थी व राजकीय संघटनांनी आज जंतरमंतर येथे आंदोलन पुकारले आहे. नियोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी आज सकाळी गुरुग्राममधील त्यांच्या घरातून युट्यूबर ध्रुव राठी यांना ताब्यात घेतले, अशी माहिती ‘कॉकरोच जनता पार्टी’ने ‘एक्स’वरील एका पोस्टद्वारे दिली. राठी हे आज जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार होते. सकाळी साधारण ८ वाजता, साध्या वेशातील सुमारे ५० पोलीस कर्मचारी ध्रुव राठी यांच्या घरी पोचले, असे सीजेपीने म्हटले आहे.

दिल्लीत सुमारे २५ हजार पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किमान ४५ मेट्रो स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, तसेच दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि इतर संवेदनशील ठिकाणांवर देखरेख वाढवण्यात आली आहे.

सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याबाबतच्या चिंता आणि मोठ्या संख्येने लोक जमा होण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रशासनाने निदर्शनांना परवानगी नाकारली असून, प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमांवर पोलिसांनी कसून तपासणी सुरु केली आहे. त्यामुळे सर्वच सीमांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. काही सीमा सील केल्याची माहिती मिळत आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आजच्या आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी संसद मार्ग परिसरातून काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

नवी दिल्लीतील सर्व महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. मार्केटही बंद राहणार आहे. मेट्रो आणि अनेक रेल्वेही बंद करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात केली आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!